जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी ही महापालिकेची जबाबदारी असून, महापालिका आपल्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही, अशी ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिली. महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम हे महापालिकेकडून संबंधित नागरिक, यंत्रणा यांच्याशी नोडल ऑफिसर म्हणून समन्वय साधतील, असे जाहीर केले.
वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे लवकरच हा मार्ग काेंडीमुक्त हाेईल, असा विश्वासही राव यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याबराेबर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या ५० वॉर्डन असून, त्यांना आणखी १०० वॉर्डन तातडीने दिले जाणार आहेत.
या बैठकीला घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ, अपर आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नागरिकांनी अवजड वाहनांच्या वेळा, रस्त्याची स्थिती, सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्किंग, हातगाड्या, सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, फ्लायओव्हरची स्थिती, वाहतुकीचे नियम मोडणारे नागरिक आदी समस्या मांडल्या. या समस्यांमुळे शाळकरी मुलांचे हाल होत असल्याची व्यथा मांडली.
आ. सरनाईक यांनी घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक बंद व्हावी, यासाठी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. अवजड वाहनांच्या वेळा पाळणे आणि बेकायदा पार्किंग थांबविणे याची पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही सरनाईक म्हणाले. अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी. रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी पालिका तत्काळ उपाययोजना करत असून, त्याचे परिणाम १५ दिवसांत दिसू लागतील. लेन मार्किंग, दिशादर्शक, फ्लायओव्हरवरील प्रवेशापासून डिव्हायडर आदींमध्ये सुधारणा केली जाणार आहे.