- मुरलीधर भवारकल्याण : कल्याणमध्ये राहणारे मुकुल गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. त्याचे निदान उशिरा झाले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी दोनच वर्षे जगू शकाल, असे सांगितले. मात्र, ते आता ५० वर्षांचे आहेत. हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना उपचारासाठी त्यांनी समुपदेशन तसेच मागदर्शन करून मदत मिळवून दिली आहे.आईच्या गर्भात असतानाच गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. मात्र, १६ व्या वर्षी त्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपांनाच छिद्र असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. ते दोनच वर्षे जगतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. गरे यांनी शालेय व पदवी शिक्षण घेतल्यावर मेडिकल रिप्रेंझेटेटिव्हची नोकरी पत्करली. हृदयाला छिद्र असल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही. मात्र, ४० व्या वर्षी त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह केला. तिला त्यांनी तिच्या मुलासह स्वीकारले. त्यांचा वैद्यकीय व्यवसायाशी तसा चांगला संबंध आला.हृदयाला छिद्र असलेल्यांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव गरे यांना होती. हा आजार मुलाला आईच्या गरोदरपणात होतो. आईने चुकीचे औषध उपचार घेतल्यास, तसेच फास्टफूड व बदलती आहारशैली यामुळेही हा आजार होतो. पूर्वी याचे निदान लवकर होत नव्हते. मात्र, आता निदानाचे प्रमाण वाढले आहे. हृदयाला छिद्र असलेल्यांना गरे समुपदेशन करतात. उपचारासाठी आर्थिक कुवत नसलेल्यांना ते राजीव गांधी आरोग्य योजनेतून उपचारासाठी मदत मिळवून देतात. काही वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे. गरे यांना हृदयविकार तज्ज्ञ चैतन्य गोखले यांची मदत मिळते. त्याचबरोबर त्यांनी ‘झुंज श्वासाशी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे.गरे म्हणाले, रायपूर येथील मोठ्या रुग्णालयात हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया होते. परंतु, तेथे प्रतीक्षा यादी जास्त आहे. त्यामुळे निदान झाले आणि तातडीने शस्त्रक्रिया झाली, असे होत नाही. एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. सामान्यांना हा खर्च परवडत नाही. राज्य सरकारने मुंबईत या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी रायपूर रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे, अशी मागणी गारे यांनी केली आहे. त्याचा फायदा खेड्यापाड्यातील रुग्णांना होऊ शकतो. त्यासाठी रायपूरला जाण्याची गरज भासणार नाही.सव्वासहा लाख रुग्णगरे म्हणाले, हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना प्राणवायू कमी मिळतो. हिमोग्लोबिन वाढते. दर वेळी २५० ते ३०० मिलीलिटर रक्त काढावे लागते. भारतात एक लाख लोकांमागे ५० जणांना हा आजार आढळून येते. सध्या देशात या आजाराचे सव्वासहा लाख रुग्ण आहेत.
श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 3:32 AM