मीरा रोड : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील दोघा पोलिसांनी एका पोलिस कर्मचाऱ्याकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि वैद्यकीय देयक मंजुरीसाठी दीड हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एका पोलिसाला मंगळवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक संजय पवार (४६) व लिपिक गणेश वाघेरे (३२) हे पोलिस कर्मचाऱ्यांची वेतन फरक रक्कम, वैद्यकीय देयक आदींचे प्रस्ताव तयार करून ते कोषागार कार्यालयात सादर करतात. एका पोलिस कर्मचाऱ्याने सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी, तसेच वैद्यकीय बिल मंजुरीकरिता अर्ज केला होता. त्यांच्याकडे पवार आणि वाघेरे यांनी त्या अर्जदार कर्मचाऱ्याकडे देयक कार्यालयात सादर करण्याकरिता दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे व अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. तक्रारीत तथ्य आढळल्याने पोलिस निरीक्षक स्वप्न बिश्वाससह अमित चव्हाण, सखाराम दोडे यांच्या पथकाने मंगळवारी पोलिस आयुक्तालयातून वाघेरे याला अटक केली. पवार याचा शोध सुरू आहे.