ठाणे - मुरूमाची गाडी येऊर टेकडीवर जाऊ देण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या येऊर येथील वन परिमंडळ अधिकारी विकास कदम (५०) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी येऊर येथे मुरूम माती टेकडीवर जाऊ देण्यासाठी प्रत्येक गाडीसाठी ६०० रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रमाणे त्यांच्याकडे दहा गाड्यांसाठी सहा हजारांची मागणी केली. हे पैसे दोन ते तीन दिवसात घेऊन येण्यास बजावले होते. परंतू तक्रारदारांनी २५ जानेवारी रोजी ठाणे एसीबीच्या अधिकाºयांकडे तक्रार केली. त्याच तक्रारीच्या आधाने ३० जानेवारी रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. याच दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उदयानाचे परिमंडळ अधिकारी कदम यांनी तक्रारदारांकडे या लाचेची मागणी केल्याचे उघड झाल्यानंतर सापळा रचून त्यांना उपवन तलावाच्या मुख्य गेटजवळ लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी ठाणे एसीबीचे े पोलीस निरीक्षक स्वप्निल जुईकर हे अधिक तपास करीत आहे.
ठाण्यात लाचखोर वन परिमंडळ अधिकारी जेरबंद, येऊर टेकडीवर माती टाकण्यासाठी घेतली सहा हजारांची लाच
By जितेंद्र कालेकर | Published: January 31, 2023 8:57 PM