लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावे लागले. या काळात अनेक व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशाही काळात काही सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र लाचेशिवाय कामेच न करण्याची परंपरा चालूच ठेवली. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४५ कारवाया झाल्या. यातही नगरविकास विभाग अव्वल असल्याची बाब समोर आली आहे.
कोरोनाचे महासंकट येऊन जवळपास आता दीड वर्षांचा काळ लोटला आहे. याही काळात लाचखोरी मात्र थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने जानेवारी २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीमध्ये लाचखोरीचे ३० सापळे लावले. यात ३१ गुन्ह्यांची नोंद झाली. जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४६ गुन्ह्यांची नोंद झाली. तर ६८ लाचखोरांना अटक झाली. २०१९ मध्ये १०२ सापळ्यांमध्ये १०९ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१८ मध्ये १०८ सापळे लावण्यात आले असून ११२ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...............
* कोणत्या वर्षात किती कारवाया-
२०१८- १०८
२०१९- १०२
२०२०- ४५
* सर्वात जास्त कारवाया ठाणे जिल्ह्यात -
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे युनिटने १ जानेवारी ते २३ मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १७ कारवाया केल्या. यात नवी मुंबईत चार तर ठाणे विभागात १४ कारवाया झाल्या आहेत. यामध्ये अपसंपदेच्या एका प्रकरणाचा समावेश आहे.
...................................
ठाणे महापालिकेचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांंविरुद्ध २०१८ मध्ये केलेल्या गैरव्यवहारांसंबधी १ मार्च २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याविरुद्धही पाच लाखांची लाच घेतल्याचा गुन्हा ९ एप्रिल २०२१ रोजी दाखल झाला. ठाणे महापालिकेमध्ये उपकरणे पुरविण्याची निविदा मंजूर करण्यासाठी १५ लाखांची मागणी करून त्यांनी पाच लाख रुपये घेतले होते.
.................................
‘‘सरकारी नोकराने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ नये. तसेच नागरिकांनीही ती देऊ नये. कोणी मागणी करीत असेल तर त्यासंबंधी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. यासाठी जनजागृतीही केली जाते. त्यामुळे कुठे गैरव्यवहार, घोटाळा किंवा भ्रष्टाचार होत असल्यास नागरिकांनीही तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.’
डॉ. पंजाब उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे.
........................
* कोरोनाकाळात ‘नगरविकास’ची वरकमाई जोरात-
नगरविकास- ४
पोलीस - ४
अन्न व नागरी पुरवठा- १
ठाणे जिल्हा परिषद- १
महसूल- २
भूमी अभिलेख- १
......................