ठाणे: पूर्व द्रूतगती मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलावर मोटार आणि रिक्षाच्या अपघातामुळे सोमवारी सकाळी माजीवडा ते कापूरबावडी आणि साकेत पूलावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामासाठी आणि नाताळनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. घोडबंदरहून ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दहा ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तासाचा अवधी लागत होता.
पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच घोडबंदर भागातून मोठ्या प्रमाणात वाहन चालक मुंबई नाशिक महामार्ग किंवा ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या मार्गावर रिक्षा आणि मोटारीची धडक झाली. या अपघातामुळे घोडबंदरहून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर वाहनांचा वेग मंदावला होता.
त्यामुळे पाऊण तास वाहने कोंडीमध्ये अडकली होती. माजिवडा ते कापूरबावडी पर्यंत वाहनांच्या या रांगा लागल्या होत्या. साकेतहून ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर माजिवडा ते साकेत पूलापर्यंतही अशाच प्रकारे वाहनांच्या रांगा होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वाहतुक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यास सुरूवात केली. दुपारी १२.३० वाजेनंतर ही वाहतुक सुरळीत झाली. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. तसेच नाताळनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागला.