डोंबिवली: वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कमकुवत उड्डाणपुलाच्या उतारावर अवजड वाहनांच्या बंदीसाठी हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी मंगळवारी काही तासांसाठी वाहतूक अचानक बंद केली. मात्र वाहतूक विभागाच्या मनमानी कारभाराचा खरपूस समाचार घेत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला. रात्रीच्या वेळेत कमी वाहतूक असताना ही कामे होऊ शकत नाहीत का? असा सवाल करत डोंबिवलीकरांनी संताप व्यक्त केला.वाहतूक पोलिसांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे संध्याकाळी ४ वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली. वेल्डिंग मशिन, लोखंडी खांब आणि कामगारांच्या सहाय्याने काम करण्यात येत होते. वाहनचालकांनी त्या ठिकाणी येऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही दिशेला वाहतूक पोलिसांचा चमू ठाण मांडून होता. पण अवेळी घेतलेल्या या कामाच्या निर्णयामुळे शहरातील टंडन रस्ता, केळकर रस्ता, चिपळूणकर पथ, पश्चिमेला द्वारका चौक, कोपर दिशेकडील बाजू आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. हा पूल २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय देखील झालेला नसताना वाहतूक विभागाने केवळ हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी शहरातील वाहनचालकांना वेठीस का धरले, असा सवाल करण्यात आला. काम वेळेत न झाल्याने तीन तासांहून अधिक वेळ वाहतूक बंद होती, याबाबत वाहनचालकांना माहिती नसल्याने स्कूल बस, अन्य वाहनांची गैरसोय झाली होती.यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव म्हणाले की, रात्रीच्या वेळेत पुरेसा कर्मचारी नसतो. त्यातच वेल्डिंग काम करणारी यंत्रणा रात्री येण्यास तयार नसते. अनेक अडथळे होते. त्यातच अवजड वाहने पुलावर चढल्यानंतर त्यांना पुन्हा माघारी फिरवणे कठीण होते, त्यासाठी बॅरिकेड्स लावणे गरजेचे होते. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने तो निर्णय घेण्यात आला आणि काम करण्यात आले. काम झाल्यावर वाहतूक सुरू होईल, दुचाकीस्वार, चारचाकी, रिक्षा अशी वाहने लगेचच सोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. परंतु हाईट बॅरिकेड्स टाकणे अत्यावश्यकच होते.
उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेड्स टाकण्यासाठी पूल तीन तास बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 8:45 PM