अंबरनाथ : अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरालगत असलेला वालधुनी नदीवरील लहान पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून केला आहे. या पुलाच्या खालच्या बाजूला असलेला रस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.अंबरनाथ प्राचीन शिव मंदिराच्या बाजूने वाहणारा वालधुनीचा प्रवाह हा धोकादायक झाला आहे. या नदीमुळे शिव मंदिर आणि परिसरातील वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. शिव मंदिराकडे जाणारा लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने, पुलाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने, या पुलावरील कठडे पडले आहेत.
सोबतच पुलाच्या खालचा भागही खचला आहे. त्यामुळे हा पूल बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या प्रवाहात हा पूल धोकादायक होत असल्याने आता नव्या पुलाचा प्रस्ताव तयार करण्याची वेळ आली आहे. मंदिर आवारातही पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.