लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पावसाळ्यामुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील काळू, भातसा, उल्हास व बारावी या नद्या तुडुंब भरून वाहत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुंदे गावाजवळून वाहणाऱ्या काळूनदीवरील पूल रविवारी रात्री पाण्याखाली गेला होता. सोमवारी सकाळी ९ वाजता पाणी ओसरले असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाने शनिवारपासून कल्याण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसाचा जोर सोमवारीही कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा उल्हास व बारवी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना चांगलाच फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे रविवारी रात्री उशिरा रुंदे गावाजवळील काळूनदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे येथील १० ते १२ गावांचा शहरांशी संपर्क तुटला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने सोमवारी सकाळी ९च्या सुमारास पुलावरील पाणी ओसरले. परंतु, नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचे प्रमाण वाढले तर हा पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
------------
काळूनदीवरील पूल दरवर्षी पावसात चार ते पाच वेळा पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
- सखाराम जाधव, रहिवासी, फळेगाव
-----------
काळूनदीवरील हा पूल नेहमीच पावसाच्या पुरात पाण्याखाली जातो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, दूधवाले व भाजीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नवीन उंच पूल उभारावा.
- भाऊ चौधरी, रहिवासी, रुंदे
------------------