सदानंद नाईक
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पुलाला नवीन वर्षात मुहूर्त मिळणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी असणारा एकमेव वालधुनी नदीवरील पूल जीर्ण झाल्याने, तो पाडण्यात आला. त्याजागी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. या निषेधार्थ समाजसेवक शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, सविता रगडे-तोरणे आदींनी माजी आमदार पप्पु कलानी, युवानेते कमलेश निकम यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही आंदोलन केल्यावर, महापालिकेला जाग आली. वालधुनी नदीवरील जुन्या पुला शेजारी जलवाहिनी आहे. नवीन पूल बांधण्यापूर्वी तेथील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. असे कारण महापालिकेच्या वतीने देण्यात आले. जलवाहिनीचे काम झाल्या शिवाय नवीन पुलाला मुहूर्त लागणार नसल्याचे यामुळे उघड झाले.
रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जोडणाऱ्या वालधुनी नदी पुलाची आवश्यकता असून नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जुना पूल पाडण्यात येऊन नवीन पूल बांधणीला मुहूर्त लागत नसल्याने, नागरिकांत असंतोष आहे. यातूनच मनसेसह समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाली. अखेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नदीवरील जुन्या पुला शेजारील जलवाहिनी हटविण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. म्हणजे सन २०२३ या नवीन वर्षात पुलाच्या कामाचा मुहूर्त लागण्याचे संकेत दिले. पावसाळ्या पूर्वी पुलाचे काम न झाल्यास, नागरिकांचे हाल होणार आहे. मनसे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मात्र जलवाहिनी बरोबरच पुलाचे काम सुरू केल्यास, पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणार असल्याचे म्हणणे आहे. एकूणच पुलाचे काम रेंगाळणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
अरुंद पुलावरील वाहतूक धोकादायक
रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे वाहने जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल पडल्याने, रिक्षा चालक व मोटरसायकलस्वार सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद नदीवरील पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून पुलावरून येणारी वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"