लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गाजियाबादच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मुंब्य्रातील त्या मुलाने ऑनलाइन गेमद्वारे सुमारे ४०० हिंदूंचे धर्मांतर केल्याचा दावा केला आहे. परंतु, यातून केवळ मुंब्य्राला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ व ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी सत्य काय आहे ते समोर आणावे, अन्यथा १ जुलै रोजी मुंब्रा बंद करून हिंदू - मुस्लीम समाजाचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा कट रचला गेला, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे व रोहिदास मुंडे सुदैवाने ते बचावले. भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर शहराचे काय?, असा सवाल त्यांनी केला.
...तर आमदारकीचा राजीनामा देईन
गाजियाबादच्या ज्या अधिकाऱ्याने आरोप केले आहेत, त्यांनी ते कागदोपत्री सिद्ध करावे. मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे खुले आव्हानही आव्हाड यांनी दिले. ४०० सोडा इथे चार जणांची तरी नावे जाहीर करा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.