ठाणे : ठाणे पूर्व, मीठबंदर रोड गणपती विसर्जन घाट परिसरात बुधवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी खोदाईचे काम सुरू असताना या ठिकाणी जुना रेल्वे ट्रॅक आढळून आला. त्यामुळे या भागात आला कसा, याची उत्सुकता येथील रहिवाशांमध्ये चांगलीच शिगेला पोहोचली होती.
हे रेल्वेरूळ ब्रिटिशकालीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, त्याची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तूर्तास हा ट्रॅक येथून काढला जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे. हा ट्रॅक ब्रिटिशकालीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १८५३ मध्ये भारतातील पहिली रेल्वे वाडीबंदर ते ठाणे अशी धावली. याच दरम्यानच्या काळात पुढे रेल्वेचे विस्तारीकरण मीठबंदर रोड येथे झाले. येथे मिठागर असल्याने मालगाडीच्या डब्यातून मीठ वाहून नेले जात होते. मात्र, काळाच्या ओघात मिठागरे बंद पडली आणि मालवाहतूकही बंद झाली. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या काळात रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर याठिकाणीसुद्धा रस्ता तयार झाला. त्यामुळे हा ट्रॅकही रस्त्याखाली गेला. बुधवारी या भागात खोदाई सुरू असताना पुन्हा तो आढळून आला आहे. सुमारे १०० वर्षे जुना हा ट्रॅक आहे. त्यानुसार, याची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारीसुद्धा आले होते. त्यामुळे आता ट्रॅकचे काय करणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु, तो येथून काढण्याच्या हालचाली मात्र वाढल्या आहेत. तो काढल्याने रेल्वेच्या पाऊलखुणा कायमच्या मिटल्या जाणार, हे मात्र निश्चित आहे.