अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवाजी चौक ते वडवली वेल्फेअर सेंटरदरम्यान पालिकेने तयार केलेला काँक्रिटचा रस्ता हा निकृष्ट असल्याने तो रस्ता पूर्ण तोडण्यात आला आहे. तर, नव्या कामामध्ये शिवाजी चौक ते लोकनगरीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जुना काँक्रिटचा रस्ता तोडून तोही नव्याने तयार करण्यात येणार आहे.ऐन गणेशोत्सवात शिवाजी चौक ते वडवली वेल्फेअर सेंटरच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. हा रस्ता बंद झाल्याने गणेशभक्तांना त्रास सहन करण्याची वेळ आली होती. रस्ता खोदल्यानंतर सलग दोन दिवस हा रस्ता तसाच ठेवण्यात आला. त्यावर कोणतेच काम झाले नाही. याबाबत तक्रारी वाढताच कंत्राटदाराने बुधवारी या रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले. कंत्राटदारामार्फत या रस्त्यावरील जुन्या काँक्रिट रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. वडवली वेल्फेअर सेंटर ते शिवाजी चौक या रस्त्याचा अर्धा भाग हा काँक्रिटचा करण्यात आला होता. मात्र, त्या रस्त्याचे कामही निकृष्ट असल्याने टीकाही झाली होती. अंबरनाथ शहरातील पहिल्या काँक्रिट रस्त्यांपैकी एक रस्ता म्हणून याचे काम केले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे पालिकेने नव्या प्रस्तावात हा रस्ता तोडून नव्याने काँक्रिटचा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने या रस्त्याचे काम करताना जुन्या रस्त्याचे खोदकाम करून हा रस्ता मोकळा केला आहे.एमएमआरडीएने रस्त्याचे काम करताना प्रस्तावित तरतुदीप्रमाणे काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, शिवाजी चौक ते वडवलीपर्यंतच्या रस्त्याचे काम करताना त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवणे आणि रस्ता रुंदीकरणाची जबाबदारी पालिकेची होती. मात्र, पालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीत अजूनही योग्य कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम नियोजित विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्याप्रमाणे होणार की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही.रुंदीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्षरस्त्याचे काम होत असताना दुसरीकडे पालिकेने रस्ता रुंदीकरणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र, पालिकेने अजूनही रुंदीकरणाबाबत या रस्त्यावर ठोस कार्यवाही केलेली नाही.
शिवाजी चौकातील काँक्रिट रस्ताही तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:07 AM