ठाणे : चालणे हा सर्वांत सोपा व्यायाम आहे. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा गुडघा-कंबरदुखी टाळण्यासाठी रोज किमान ४५ मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो; परंतु हल्ली चालण्याची सवय मोडल्याने आणि कमी अंतरावर गाडी घेऊन जाण्याची सवय लागल्याने नको त्या वयात गुडघे-कंबरदुखीला सामोरे जावे लागते. फिट राहण्यासाठी सकाळी चालणे आणि रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे आवश्यक असते.
सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. सकाळी उठून चालण्यासाठी कंटाळा केला जातो. आळसपणामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष करण्याची सवय अनेकांमध्ये दिसून येते. ताज्या हवेत चालण्याने शरीराला अनेक फायदे होतात. चालणे हा असा व्यायाम आहे की तो सकाळी, संध्याकाळी किंवा आपल्या वेळेप्रमाणे केव्हाही करता येतो. जंकफूड आणि कोल्ड्रिंक प्यायल्याने हाडांची झीज होते. त्यामुळे कमी वयात विशेषतः तरुणाईमध्ये कंबरदुखी आणि गुडघेदुखी हे आजार दिसून येत आहेत, असे निरीक्षण जिम प्रशिक्षक विनोद पोळ यांनी नोंदविले.
१) या कारणांसाठीच होतेय चालणे
दुकानात जाईपर्यंत, एखादी वस्तू आणण्यासाठी किंवा लिफ्टचा वापर टाळून पायऱ्यांचा वापर केल्यास तसेच गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत किंवा केली तर शतपावली. तरुणाई आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी चालत जाऊ शकतात.
२) म्हणून वाढले हाडांचे आजार
चालणे निश्चितच कमी झाले आहे. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानेचे आजार, सांधेदुखी, लठ्ठपणा वाढला आहे. लठ्ठपणामुळे शरीराची रचना बदलली आहे आणि शरीराची रचना बदलल्यामुळे फ्रोझन शोल्डर, टाचदुखी तर लठ्ठपणामुळे मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत, आत्मविश्वास कमी होत आहे.
- डॉ. प्रणित गायकवाड, भौतिकोपचारतज्ज्ञ
३) हे करून पाहा
जे ऑफिसमध्ये काम करतात ते खुर्चीवर बसल्या बसल्यादेखील थोडा वेळ व्यायाम करू शकतात. एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळू शकतात.
३) ज्यांना पायी चालणे शक्यच नाही ते घरी खुर्चीवर किंवा पलंगावर बसून लेग एक्सटेन्शन, झोपून लेग रेझेस यासारखे व्यायाम करू शकतात. गुडघेदुखी असेल तर स्नायूंचा व्यायाम करावा; परंतु हे व्यायाम करताना त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. गुडघेदुखी आहे त्यांनी जिने चढणे टाळावे. जे बाहेर चालायला जातात त्यांनी सपाट रस्त्यावर; परंतु शूज घालून चालावे. तसेच कोणताही व्यायाम करताना योग्य आहार असावा.
- विनोद पोळ, जिम प्रशिक्षक