- वसंत पानसरे किन्हवली : मुरबाड उपविभागांतर्गत असलेल्या अदिवली लघुपाटबंधारे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. एक कोटीच्या आसपास निधी मंजूर असलेल्या या डाव्या कालव्याचे दोन किलोमीटर लांबीचे काम किन्हवली येथील कंत्राटदाराला मिळाले आहे. त्याने लॉकडाउनचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे काम करत असून जुन्याच फुटलेल्या पाइपचा वापर करून जोडण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.
अदिवली लघुपाटबंधारेअंतर्गत परिसरातील चरीव, अदिवली, आष्टे व मानेखिंड या गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळत असून सुमारे ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. १९९५-९६ या वर्षी युरोपीय आर्थिक समुदाय यांच्या निधीतून दोन किलोमीटर डाव्या कालव्याचे भूअंतर्गत आरसीसी व पीयूसीचे काम झाले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी दुबार पीक घेत होते. परंतु, १५ वर्षे हा कालवा दुरुस्तीअभावी बंदच आहे.
तब्बल २४ वर्षांनंतर कालव्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले असून तब्बल ९९ लाखांच्या खर्चाला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांना शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य होणार होते. परंतु, कंत्राटदाराने या कामात नवीन पाइप, ६०० मिमी, ४५० मिमी व ३०० मिमी पाइप व पीयूसी दुरुस्ती, चेंबर बांधणे गरजेचे असताना लॉकडाउनचा फायदा घेत घाईघाईने काम पूर्ण करण्यासाठी फुटक्या प्लास्टिकच्या पाइपांचा वापर जोडण्यासाठी केला. ग्रामस्थांनी ही माहिती संबंधित अधिकाºयांना देताच दुरुस्तीचे काम बंद केले आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.
अदिवली लघुपाटबंधारे येथील डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असून कंत्राटदार जुनेच फुटलेले पाइप जोडत असल्याचे निदर्शनास आल्याने काम बंद करून नवीन पाइप बसविण्यास व अंदाजपत्रकानुसार काम करायला सांगितले आहे.- के.एस. भानुशाली, कनिष्ठ अभियंता