ठाणे: वर्तणूकीत सुधारणा करण्यासाठी जाब विचारणाऱ्या दुर्गा अनिल कुंटे (४०) या बहिणीचाच लोखंडी सळईने खून करणाºया संजू विलास लोखंडे (३०, रा. तळेगाव, एमआयडीसी, पुणे) या भावाला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी रविवारी दिली. आपल्या आईला वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या १४ वर्षीय भाच्यावरही त्याने लोखंडी सळईने खूनी हल्ला केला आहे.
ठाण्यातील कोकणी पाडा भागात राहणाऱ्या दुर्गा कुंटे आणि यातील आरोपी संजू लोखंडे यांचे २७ ऑक्टाेबर २०२३ रोजी कौटूंबिक कारणावरुन भांडण झाले होते. याच भांडणातून दुर्गाने त्याला आपली वर्तणूक सुधारण्यावरुन चांगलेच धारेवर धरले. याच रागातून पुण्याहून कधीतरी बहिणीकडे येणाऱ्या संजूने २८ ऑक्टाेबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुंटे चाळीत शिवसेना शाखेच्या समोरील घरात येऊन दुर्गा यांच्याशी पुन्हा वाद घातला. या वादातूनच संजू याने दुर्गाच्या डोक्यावर, नाकाच्या खाली, जबड्यावर आणि डोळ्यावर लोखंडी पाईपने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी तिचा मुलगाही आईला वाचविण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, चवताळलेल्या संजूने त्याच्याही डोक्यावर, भुवईवर लोखंडी पाईपने प्रहार करीत त्याच्या खूनाचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुर्गाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. जखमी मुलावर मात्र, उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी खून, खूनाचा प्रयत्न अशा कलमांखाली चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वनिता पाटील या अधिक तपास करीत आहेत.तरीही त्याने केला खून...
या हल्ल्याच्या वेळी घरात झोपलेल्या दुर्गाला उठवून संजूने तिच्यावर हा हल्ला केला. दुर्गाची आई आंघाेळीला गेली होती. तिची मुलगी आणि मुलगाही घरातच होता. या तिघांनाही न जुमानता दुर्गावर त्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला.