भिवंडी - कौटुंबिक जमिनीच्या वादातून तिघांनी मिळून एकाची हत्या केली. ही घटना तालुक्यातील पायगाव येथे घडली. हत्येनंतर आरोपीचे कुटुंब फरार झाले आहे.राजू प्रभाकर भालेकर (३६) असे हत्या झालेल्या चुलत भावाचे नाव असून त्याचा काका आनंद बाबू भालेकर (४४) याच्याबरोबर पायगावमधील माळरान जमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद सुरू होता. या जमिनीचा सात-बारा उतारा राजू भालेकर याने काढून गावातील गंगाधर गुळवी यांना दिला होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता याबाबत राजू आपली पत्नी सरिता हिच्याबरोबर चर्चा करत असताना शेजारी राहणारा काका आनंद भालेकर याच्याबरोबर त्याची दोन मुले हर्षद भालेकर (२४) व देवेश उर्फबंटी भालेकर (१९) हे तिघे राजूच्या घरात शिरले. त्या तिघांनी मिळून राजूला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात हर्षद याने चुलत भाऊ राजू याच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्याने तो जागेवरच कोसळला. राजूला गंभीर अवस्थेत काल्हेर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते; परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याला शनिवारी ठाण्यातील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरिता हिने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आनंद भालेकर, हर्षद भालेकर व देवेश भालेकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीच्या वादातून भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:56 AM