बदलापूर : बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. त्याचा परिणाम शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील अंदाजे चार हजार ग्राहकांसह, पोस्ट, बँका, मालमत्ता नोंदणी ही शासकीय कार्यालये आणि मोबाईल धारकांवर झाला आहे. दूरध्वनी आणि इंटरनेटची सेवा पुरवताना सातत्याने बीएसएनएलबाबत नेहमीच ग्राहकांची ओरड असते. बदलापूर येथील बीएसएनएलची सेवा बुधवारी ठप्प झाली. बीएसएनएलचा विद्युत पुरवठाच बुधवारी बदलापूरच्या महावितरण अधिकाऱ्यांनी खंडित केला होता. बीएसएनएलने डिसेंबर २०१८ या महिन्यातील पाच लाख १७ हजार रुपयांचे विद्युत बिल वेळेवर न भरल्याने महावितरणने बुधवारी बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे परिणामी बदलापूर शहरातील पूर्व भागातील अडीच हजार आणि पश्चिम भागातील ७०० ग्राहकांचे दूरध्वनी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा यामुळे ठप्प झाली होती.तसेच बीएसएनएलकडून सर्व शासकीय कार्यालयात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा दिली जाते. त्यामुळे बुधवारी पोस्ट, महत्त्वाच्या बँका, मालमत्ता नोंदणीचे कार्यालय या सर्व शासकीय कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला होता. तर विद्युत पुरवठ्याअभावी बुधवारी दिवसभर बीएसएनएलला जेनरेटरचा आधार घेत आपला कारभार हाकण्याची वेळ आली होती. तर याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, बीएसएनएलने विद्युत बिलाचा भरणा केल्यास तात्काळ त्यांचा विद्युत पुरवठा सुरू केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 6:12 PM