ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक जशी जवळ येऊ लागल्याने शहरात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. कॉंग्रेसपाठोपाठ बसपानेदेखील आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ठाण्यात आयोजित संवादयात्रेत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी पक्षाची भूमिका मांडताना ही स्वबळाची घोषणा केली.
ठाणे महानगरपालिकेत एकेकाळी पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले होते. कल्याणमध्ये एक आणि उल्हासनगरमध्ये दोन नगरसेवक आतापर्यंत निवडून आले आहेत. त्यामुळे बसपा आता सर्व ताकद पणाला लावून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीनंतर बसपाच्या सहकार्याशिवाय ठाण्यात महापौर बसणार नाही, अशी ताकदीचे संघटन उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमात बसपा महासचिव प्रा. प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव अमोल कांबळे, सुदाम गंगावणे, प्रदेश सदस्य विद्याधर किरतावडे, जिल्हा प्रभारी सुनील मडके, जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव, शहर अध्यक्ष नागेश जाधव उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात मायवतींचे सरकार येणार
बेरोजगारी, भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी तसेच असुरक्षितेने ग्रस्त उत्तर प्रदेशातील जनता यंदा पाचव्यांदा मायावती यांच्या नेतृत्वात बसपाचे सरकार निवडून आणणार असल्याचा दावा या वेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केला.