ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरीस्कमधील नागरीकांना ठेवण्यासाठी देखील जागा अपुऱ्या पडु लागल्या आहेत. तसे एखादा रुग्ण कोपरी किंवा मुंब्य्रात आढळला तर त्याच्या संपर्कातील हायरीस्कमधील व्यक्तींना भार्इंदरापाड्याला नेणे दुरचे ठरत होते. त्यामुळे यावर तोडगा म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रत्येक प्रभाग समिती अतंर्गत असलेल्या बीएसयुपीच्या रिकाम्या इमारती, शाळा किंवा हॉल यासाठी उपलब्ध करुन ते ताब्यात घाव्याते असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता पालिकेकडून तसे नियोजन केले जाऊ लागले आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला ४ हजारांच्यावर कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यातील १८४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११६ जणांचा मृत्यु आतापर्यंत झाला आहे. पंरतु एखाद्या ठिकाणी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला तरी त्याच्या संपर्कात आणखी किमान चार ते पाच नागरीक हे हायरीस्कमधील असतात. त्यामुळे ही संख्या आता दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतात तसेच हायरीस्कमधील नागरीकांची संख्याही वाढत आहे. तसेच या हायरीस्कमधील नागरीकांना ठेवण्यासाठी सध्या भार्इंदर पाडा येथील इमारती शिल्लक आहेत. परंतु त्यांची क्षमताही आता संपुष्टात येऊ लागली आहे, त्यामुळे या हायरीस्कमधील नागरीकांना कुठे ठेवायचे असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. यातूनच आता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत बीएसयुपीच्या रिकाम्या इमारती ताब्यात घेण्याचे काम सुरु झाले आहे. ज्या प्रभाग समितीमध्ये अशा इमारती नसतील त्याठिकाणच्या शाळा, किंवा हॉलही आता या उद्देशासाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. यामध्ये अगदीच लोकवस्ती असलेल्या भागातील अशा इमारती वगळल्या जाणार आहेत. या नव्या धोरणानुसार एखादा रुग्ण कोपरी, मुंब्रा किंवा कळवा किंवा अन्य लांबच्या भागातील असेल तर त्याच्या संपर्कातील हायरीस्कमधील नागरीकांना भार्इंदरपाडा येथे नेले जात होते. परंतु हे अंतर खुपच लांब होते. त्यामुळे आता त्याला त्याच विभागात किंवा प्रभागात अशा इमारतीमंध्ये आता ठेवले जाणार आहे. याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पालिकेने म्हंटले आहे.या अनुषंगाने आता कोपरीतील सिध्दार्थ नगर भागातील बीएसयुपीच्या इमारती यासाठी वापरात घेतल्या जाणार आहेत. परंतु पालिकेच्या या धोरणाला स्थानिक नगरसेवकांसह इतरांनी विरोध केला आहे. वास्तविक पाहता येथील रहिवाशांना अद्यापही या घरांच्या चाव्या दिलेल्या नाहीत. मागील कित्येक वर्ष येथील रहिवासी हक्काच्या घरापासून बेघर आहे. आता इमारती उभ्या असतांना पालिकेने रहिवाशांना देण्याऐवजी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात असलेल्या हायरीस्कमधील नागरीकांना दिल्या जाणार आहेत. परंतु पालिकेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत येथील रहिवाशांनी पालिकेला विरोध केला.
हायरीस्कमधील संशयीतांसाठी आता बीएसयुपीच्या इमारती, शाळा, हॉल पालिका घेणार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 4:13 PM