बदलापूर - बदलापूर नगरपालिकेने जाहीर केलेल्या बीएसयूपी पात्र लाभार्थ्यांच्या प्रारूप यादीसंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी देण्यात आलेली मुदत पूर्ण झाली आहे. या मुदतीत एकही हरकत नोंदवली गेली नसल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेत बीएसयूपी योजनेची जबाबदारी सांभाळणारे अभियंता विकास ममाणे यांनी दिली.बदलापूर नगरपालिकेच्या वतीने जाहीर केलेल्या बीएसयूपी लाभार्थ्यांच्या प्रारूप यादीमध्ये २२७ लाभार्थ्यांची नावे आहेत. त्यामध्ये संभाजीनगर येथील ५१, नेताजी सुभाषनगर नं. २ येथील १२२, विवेकानंदनगर येथील ४, शास्त्रीनगर येथील २५, रामनगर येथील ११, संजयनगर येथील ४, रोहिदासनगर येथील आठ व शिवाजीनगर येथील दोन लाभार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी व लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे यांची छाननी केल्यानंतर नगरपालिकेने या लाभार्थ्यांना बीएसयूपी घरकुले देण्याचे निश्चित केले असून त्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. सर्वेक्षणात नमूद इतर लाभार्थ्यांची कागदपत्रे व पुराव्यांची छाननी सुरू असून त्यानुसार पुढील निवड यादीही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.बीएसयूपी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलांचे वाटप व्हावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलकांना ३१ डिसेंबरपूर्वी लाभार्थीयादी जाहीर करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिले होते. त्यानुसार, या कामाला वेग आला आणि आठवडाभरापूर्वी पहिली प्रारूप यादी प्रसिद्ध झाली.किती हरकती आल्या विचारताच तारांबळमुदत संपल्यानंतरही किती हरकती आल्या, याबाबत माहिती देताना बीएसयूपीचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांची तारांबळ उडाली होती. सातत्याने तीन दिवस पाठपुरावा केल्यानंतर सहकारी अभियंत्याला फोन करून बीएसयूपीच्या प्रारूप यादीबाबत एकही हरकत प्राप्त झाली नसल्याचे या अभियंत्यांनी स्पष्ट केले. मुदतवाढीनंतर हरकती नोंदवल्या गेल्यास त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
बीएसयूपी योजना : लाभार्थ्यांच्या यादीबाबत हरकती नोंदवल्याच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 2:33 AM