लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील काही व्यक्तींकडून अत्यंत घाणेरड्या शब्दांत बौध्द भिक्खुंविषयी अपमानजनक वक्तव्य केले जात असल्याचा आारोप केला जात आहे. त्यास वेळीच आळा घालून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी सर्व भिक्खू म्हणजे बौध्दधम्म गुरूंनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तालयावर हा मोर्चा काढून निवेदन दिले.
येथील शांतीदूत एज्युकशनल अॅन्ड सोशल अकॅडमी, मानपाडा घोडबंदर रोड येथील धम्मगुरू धम्मभिक्खू के.आर लामा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मानसिक विकृती असणारे समाजकंटक, शांतीदूत बौध्द विहार चितळसर मानपाडा, ठाणे येथील बौद्ध भिक्खुंना दमदाटी करीत असल्यचा आरोप या मोर्चेकरी धर्मगुरूंनी केला आहे. या व्यक्ती शांतीदुत बौध्द विहारात येऊन बौध्द भिक्खुंना मारहाण,हाकलून देण्याची धमकी देत असल्याचे स्पष्ट करून विहारातील वस्तुंची, समानांची तोडफोड ते करीत असल्याचे या मोर्चेकरांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. सतत होत असलेला हा अन्याय दूर करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी हा मोर्चा येथील पोलिस आयुक्तालयावर आज काढण्यात आला होता. येथील कोर्टनाका परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समस्त बौध्द भिक्खु संघ, मुंबई प्रदेश भिक्खु संघ, समस्त बौध्द उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.