कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका...
उल्हासनगर ध्वनिप्रदूषणात अव्वल आहे. ‘हिराली’ मार्फत प्रदूषणाबाबत आवाज उठविला जात आहे. सरकारने वेळेत पर्यावरणाबाबत पाऊले उचलायला हवीत. अर्थसंकल्पात नुसता निधी राखून ठेवून चालणार नाही. यासाठी पर्यावरणाबाबत जागृती करणेही महत्त्वाचे आहे. - सरिता खानचंदानी,हिराली फाउंडेशन
वालधुनी नदी देशातील सर्वाधिक प्रदूूषित नदींच्या यादीत आहे. ठाणे जिल्ह्याला पिण्याचे पाणी देणाऱ्या उल्हास नदीची वाटचाल वालधुनीच्या दिशेने होत आहे. अर्थसंकल्पामध्ये उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी निधी ठेवला पाहिजे.- शशिकांत दायमा, वालधुनी- उल्हास नदी बचाव संघटना
यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे. आपल्या देशात प्रदूषणामुळे जल, जमीन, वायू हे सर्वच प्रदूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या बाबतीत विविध प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. - विजय भोसले, पर्यावरणप्रेमी
संविधानामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीनिश्चित केलेली आहे. अनेक कायदे व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून सोयीनुसार करून परवानग्या देणे बंद झाले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी बजेटमध्ये जास्तीची तरतूद करणे आवश्यक आहे. - रूपाली श्रीवास्तव, पर्यावरणप्रेमी
केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपाय व संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केली गेली पाहिजे. केवळ पर्यावरण संरक्षणाचा बोलघेवडेपणा शासनाने करू नये. पर्यावरणाचे संरक्षण करून विकास व्हायला हवा. - कृष्णा गुप्ता, पर्यावरणप्रेमी, भाईंदर