वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत अवघ्या दोन तासात संमत करण्यात आला. आता पुढील अंतिम मंजुरीसाठी तो विशेष महासभेत सदर करण्यात येणार आहे.स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अर्थसंकल्पावर दोन तास चर्चा करण्यात आली. त्यात दिवाबात्तीच्या व्यवस्थेसाठीची २५ लाखांची तरतूद १ कोटी करावी. तसेच आपत्कालीन व्यवस्थेसाठी करण्यात आलेली ५० लाखांची तरतूद १ कोटी करावी अशा मागण्या करण्यात आल्या. या चर्चे मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचा ‘पी’, ’जेंडर’ बजेट व इतर वंचित घटकांबाबतच्या कल्याणावर होणारा खर्च हा वर्षानुवर्षे कमी होत असल्याने यापुढे योग्य असे नियोजन आखून खर्च करण्यात यावा अशी सूचना शिवसेना उपजिल्हा प्रमुख, गटनेता धनंजय गावडे यांनी केली. मच्छिमार बांधवांच्या कल्याणकारी योजनांसाठी केलेल्या तरतूदीत वाढ करण्यात यावी तसेच पाणजू येथे झालेल्या बोटीच्या दुर्घटनेबाबतचा मुद्दा उपस्थित करून फेरी सेवा वाढविण्याचे सुचवले. महिला, बालके, मच्छिमार, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय यांच्या साठी महापालिका राबवत असलेल्या योजनांच्या जाहिराती करून जनजागृती करावी. तसेच पर्यटन स्थळांचा विकास करून अधिकाधिक महसूल उभा करता येईल, अशा सूचना करण्यात आल्या.
स्थायीने मंजूर केला दोन तासांत अर्थसंकल्प
By admin | Published: March 04, 2016 1:27 AM