लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या अंदाजपत्रकाला महिनाभरापूर्वी मान्यता मिळूनही अद्यापपर्यंत त्याची पुस्तिका नगरसेवकांना वितरित केलेली नाही. अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला लागत असलेला विलंब पाहता यंदाही सत्ताधारी त्याचे तीन तेरा वाजवणार असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना निवेदन दिले आहे. त्यात अंदाजपत्रीकेच्या पुस्तकाचे काय झाले?, असा सवाल केला आहे. मार्च अखेरीस झालेल्या विशेष महासभेत अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. परंतु, त्याला महिना उलटून गेला असतानाही अंदाजपत्रकीय पुस्तिका नगरसेवकांना उपलब्ध झालेली नाही. मागील वर्षीही अंदाजपत्रकाला विलंब झाला होता. त्यावेळी तत्कालीन स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी देवळेकर यांना जबाबदार धरत अंदाजपत्रकाचे वाटोळे केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यंदाही अंदाजपत्रकाला विलंब झाला असून यात नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात खटके उडत आहेत. प्रभागातील नागरी विकासकामे खोळंबली असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे. अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेला विलंब करणारे मुख्य लेखाधिकारी, भांडार अधिकारी यांच्यावर महापौरांचा अंकुश नसल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. दरवर्षी पुस्तकाच्या प्रकाशनाला विलंब होत असताना आपण त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही, असेही भोईर यांनी महापौरांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे. मागील वर्षीही विलंबामुळे अंदाजपत्रकाचे बारा वाजवले होते. यावर्षीच्या अंदाजपत्रकाचे तीन तेरा वाजण्याची चिन्हे असून, अभ्यासू महापौरांकडून ही अपेक्षा नसल्याची भावना नगरसेवकांची आहे, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. जर अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेला अशाप्रकारे विलंब लागत असेल तर घाईघाईने ते मंजुरीला का आणता? असा सवालही भोईर यांनी केला आहे.
अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेला विलंब
By admin | Published: May 10, 2017 12:07 AM