संदीप शिंदे ।मुंबई : गेली सहा वर्षे खटाटोप केल्यानंतरही मेट्रो कारशेडसाठी आवश्यक असलेली ठाणे शहरातील जागा एमएमआरडीएला संपादित करता आलेली नाही. स्थानिक शेतकरी मोगरपाडा येथील प्रस्तावित जागेची साधी मोजणीसुध्दा सरकारी यंत्रणांना करू देत नाहीत. तसेच कारशेडला पर्यावरण प्रेमींचाही विरोध आहे. मात्र, ही कोंडी न फोडताच एमएमआरडीएने थेट या कारशेड उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाण्यातून धावणाऱ्या मेट्रोसाठी कारशेड उभारणीचे प्रयत्न २०१४ सालापासून सुरू आहेत. सुरुवातीला ओवळा येथील प्रस्तावित जागा स्थानिकांचा विरोध आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्यांवर रद्द करण्यात आली. त्यानंतर मोगरपाडा येथील ४२ एकर जागेचा प्रस्ताव पुढे आला तरी ती जागा देण्यासही स्थानिकांचा टोकाचा विरोध आहे. काही वर्षांपूर्वी इथल्या २०० एकर सरकारी जागेपैकी ७८ एकर जमीन स्थानिक भूमिपुत्रांना देण्यात आली होती. त्याचे पोटहिस्से अद्याप झालेले नाहीत. जागेची मोजणी केल्यानंतर त्याबाबत स्पष्टता येईल आणि कारशेडसाठी कुठली ४२ एकर जागा उपयुक्त आहे हेसुध्दा कळू शकेल. त्या भूसंपदानापोटी शेतकऱ्यांना पर्यायी जागा आणि मोबदला देण्याची सरकारी यंत्रणांची तयारी आहे. मात्र, आमच्या जागेवर कारशेड नकोच अशी भूमिका घेत स्थानिक शेतकरी जमिनीची मोजणीसुध्दा करू देत नाहीत. या संघर्षाला स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वादही आहे.हा तिढा कायम असताना बुधवारी अचानक एमएमआरडीएने या कारशेडच्या उभारणीसाठी निविदा प्रसिध्द केल्या आहेत. त्यात स्टेबलिंग यार्ड, आॅपरेशन कंट्रोल स्टेशन, प्रशासकीय इमारत, देशभाल आणि दुरूस्तीची इमारत यांसह संपूर्ण कारशेड उभारण्यासाठीच्या अनेक कामांचा समावेश करत निविदाकारांना पाचारण करण्यात आले आहे. स्थानिकांनी विरोधाचे हत्यार खाली ठेवलेले नाही, जागा ताब्यात नाही एवढेच काय २०० एकरपैकी नक्की कुठली ४२ एकर जागा संपादित करायची आहे हेसुध्दा अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे कंत्राटदार नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.जागा नक्की ताब्यात येईलएमएमआरडीएचे अध्यक्ष असलेले राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीसुध्दा आहेत. ते या तिढ्यातून नक्की मार्ग काढतील आणि मोगरपाडा येथील जमीन कारशेडसाठी मिळवून देतील, अशी आम्हाला आशा आहे. ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटदार नियुक्तीची कामे समांतर पध्दतीने सुरू राहतील. जागा ताब्यात आल्यानंतर तातडीने काम सुरू करणे त्यामुळे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.एमएमआरडीएच्या भूमिकेत बदलमोगरपाडा कारशेडचे काम तातडीने सुरू झाले नाही तर वडाळा ते कासरवडवली (मेट्रो ४) आणि कासरवडवली ते गायमुख (४ अ) या मार्गिका निर्धारित वेळेत सुरू करता येणार नाही. जागा ताब्यात येत नसल्याने कारशेडच्या कामांसाठी निविदा काढता येत नाही अशी भूमिका जानेवारी, २०२० मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालानात झालेल्या बैठकीत महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी मांडली होती. मात्र, आता परिस्थिती जैसे थे असानाही कामासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिध्द केल्या आहेत हे विशेष !बैठकीला मुहूर्त नाहीभूसंपादनाबाबत निर्माण झालेला हा तिढा सोडविण्यासाठी स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाºयांची एक संयुक्त बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्याचा निर्णय झाला होता. फेब्रुवारी महिन्यांत दोन वेळा ही बैठक रद्द झाली. त्यानंतर या बैठकीसाठी अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सांगितले.