मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील लक्ष्मी (चेणे) नदीवर पूल बांधण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या निधीस राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील ४ कोटी रुपये वर्ग केले आहेत. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, चेणे नदीचे पाणी गेले अनेक वर्षे वाया जात आहे. नदीचे पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा अशी आपली सततची मागणी होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पाणी योजना होण्याबाबत कार्यवाही झाली नाही व हा प्रस्ताव पडून होता.
पावसाळ्यात चेणे नदी पूर्ण क्षमतेने वाहत असते. या नदीत येणारे पाणी अडवून त्या पाण्यातून मीरा भाईंदर परिसरासाठी लघु पाणी पुरवठा योजना तयार करावी. बंधारा बांधला जावा, अशी पुन्हा मागणी महाविकास आघाडीचे शासन आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
संबंधित अधिकाऱ्यांसह चेणे नदीच्या परिसराची मार्चमध्ये पाहणी झाली होती. नदीवर पूल व बंधारा बांधून पाणी अडवायचे व मीरा भाईंदर शहराला या पाण्याचा पुरवठा करायचे असे ठरले व जलसंपदा विभागाने सर्वेक्षण करून येथे पूल-बंधारा बांधण्याचे डिजाईन तयार केले होते. आता चेणे नदीवर पूल बांधण्याच्या कामासाठी एकूण ३० कोटींच्या खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्यातील कामासाठी ४ कोटी रुपयांची रक्कम ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाने पत्र पाठवून कळवले आहे.
सरनाईक म्हणाले की, चेणे नदीवर पूल व बंधारा बांधून पाणी साठवले जाईल. २ दशलक्ष लिटर पाणी साठवू शकेल इतक्या क्षमतेची साठवण टाकी महापालिकेच्या माध्यमातून बांधली जाणार आहे. या पाण्याची वितरण व्यवस्था पालिकाच करेल. पालिकेचा किमान ५ दशलक्ष लिटर पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण होईल.
वसई खाडीचे पाणी नदीत मिसळू नये म्हणून या बंधा-याला एका बाजूला झडपा असणार आहेत. त्या झडपांमुळे खाडीचे पाणी नदीत जाणार नाही. तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून डोंगरावरून वाहणारे पाणी अडवले जाईल. नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात जाऊ नये यासाठी नदीच्या कडेला कुंपण भिंत बांधली जाणार आहे. पूल, बंधारा, कुंपण भिंत व साठवण टाकी अशी कामे यात होणार आहेत.
गडचिरोली येथे अशा प्रकारे 'पूल व बंधारा' बांधून 'पाणी अडवा-पाणी जिरवा' अंतर्गत गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. अशा पद्धतीने चेणे नदीवर होणारा हा ठाणे जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असणार आहे. नदीचे पाणी अडवून-जिरवून शहराला तसेच आजूबाजूचे शेतकरी व आदिवासी पाड्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदर शहरासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत. नगरविकास विभागाने चेणे नदीवरील पूल बांधकामाच्या कामाचा संपूर्ण ३० कोटीच्या खर्चासह या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानत असल्याचे सरनाईक म्हणाले.