डोंबिवली - मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना म्हात्रेनगरमधील पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी गर्दीमुळे कोपर स्थानकादरम्यानच जलद मार्गावर लोकलमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रवाशांच्या जीवापेक्षा रेल्वे प्रशासनाला आणखी काय महत्त्वाचे आहे? असा सवाल करत तिकिटांच्या माध्यमातून होणारी लाखो रूपयांची उलाढाल प्रवाशांमुळेच होते, हे लक्षात घ्या आणि तात्काळ कोपर स्थानकात संरक्षक भिंत बांधा असे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानुसार डिआरएम एस.के.जैन यांनी लवकरच तेथे त्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वस्थ केले.
रविवारी दोन महिला आणि एक चिमुरडा, त्या आधी चार महिन्यांपूर्वी पावसकर ज्येष्ठ दाम्पत्य आदींचा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता. हे पाचही म्हात्रेनगरमधील रहिवासी होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून नगरसेवक विषू पेडणेकर यांनी दोन दिवसांपासून कोपर स्थानकामध्ये जनजागृती अभियान सुरू केले होते. पण त्यातच बुधवारीही आणखी एका युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होत नसल्याने पेडणेकर यांनी तातडीने राज्यमंत्री चव्हाण यांची भेट घेत अपघातांबाबत सांगितले. तसेच २०१२ पासून संरक्षक भिंतीची मागणी करूनही रेल्वे प्रशासन मात्र त्यावर काहीही कार्यवाही करत नसल्याने अपघात थांबू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
एखाद्याचा जीव जातो याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने मध्य रेल्वेच्या डिआरएम एस.के.जैन यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या दुर्घटनांबाबत चर्चा केली. तसेच तातडीने संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले. शर्मा यांनीही तातडीने तीन अभियंते अधिकाऱ्यांना बुधवारीच कोपर रेल्वे स्थानकात पाठवले आणि वस्तूस्थितीचा अहवाल मागवला. त्यानूसार पाहणी अहवालानंतर तातडीने कोपर स्थानकात आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तातडीच्या तत्वावर तीन दिवसांत त्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांना आश्वासन देण्यात आले आहे. पेडणेकर यांनी त्यासंदर्भात पाठपुरावा करावा आणि जर काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधावा, इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ही समस्या न सोडवल्यास तात्काळ रेल्वे बोर्ड, आणि केंद्रीय रेल्वेमंत्रालयाशी संपर्क साधण्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. या स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे, भविष्याचा वेध घेत त्या पूलाची तसेच एस्कलेटरची सुविधा देखील या ठिकाणी देण्यात यावी त्या मागणीचाही तात्काळ विचार व्हावा अशी चर्चाही राज्यमंत्री चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली.