- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील व्हिटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहणार असून क्रीडा संकुल ठेकेदारांच्या घशात घालू देऊ नका. असे निवेदन मनसेने महापालिका उपयुक्तांना दिले. मैदानात कोणतेही काम न करता, खेळाडूंकडून शुल्क आकार नये. असे निवेदनात नमूद करून, तसे झाल्यास आंदोलनाचा इशारा शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला.
उल्हासनगरात व्हिटीसी मैदान, गोलमैदान व दसरा मैदान असे तीन मैदान मुलांना खेळण्यासाठी होते. याव्यतिरिक्त या मैदानात दिग्गज नेत्यांच्या सभा गाजल्या आहेत. यापैकी व्हिटीसी मैदानात क्रीडा संकुल बांधण्याला मंजुरी मिळाली. नवीन वर्षात प्रत्यक्ष क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र या मैदानाच्या खुल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करता, मैदानावर खेळाडूंना निःशुल्क खेळू द्यावे. असे आश्वासन महापालिकेकडे मनसेने मागितले. तसे आश्वासन दोन आठवड्यात महापालिकेने न दिल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान गुरवारी मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांनी मैदानाची पाहणी करून मैदानात खेळणाऱ्या असंख्य खेळाडूं सोबत हितगुज केली. तसेच क्रीडा संकुल बांधल्यानंतर असेच तुम्हाला खेळता येईल, असे आश्वासन दिले.
महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व्हिटीसी मैदानात उभे राहत असलेल्या क्रिडा संकुलाला दिले. मात्र महापालिका तरण तलाव, टाऊन हॉल प्रमाणे क्रीडा संकुल ठेकेदारांच्या घशात देवू नये. अशी मागणी मनसेने महापालिका आयुक्तांना केली. तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना तसे निवेदन दिले. यावेळी पक्षाचे सचिन कदम, संजय घुगे, प्रदिप गोडसे, शालीग्राम सोनवणे, मैनुद्दीन शेख, प्रवीण माळवे, सुभाष हटकर, काळू थोरात, राहुल वाकेकर, योगीराज देशमुख, मधुकर बागुल, अजय बागुल, अशोक गरड, महेश साबळे आदीजन उपस्थित होते.