जितेंद्र कालेकर
ठाणे: तब्बल ३८ कोटी ४५ लाखांचे धनादेश न वटल्याप्रकरणी (बाऊन्स केल्याने) ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल कुरसिजा (साहिल रियलेटर्सचे मालक) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली. त्यांना विना जामीन अटक करण्याचे आदेशच ठाणे न्यायालयाने काढून पोलीस आयुक्त जयतित सिंग यांना याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अनिल कुरसिजा यांना धनादेश न वटल्याप्रकरणात १० नोव्हेंबर रोजी अटक केली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पाचपाखाडी येथे कुरसिजा वास्तव्याला असून त्यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी कलम १३८ नुसार गुन्हा दाखल झाला होता. वारंवार समन्स बजावूनही कथित आरोपी हजर होत नसल्याने त्यांना या प्रकरणात एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच ३८ कोटी ४५ लाखांची रक्कमही भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आपले पती धार्मिक कारणासाठी मध्यप्रदेशात गेल्याचे त्यांच्या पत्नीकडून नौपाडा पोलिसांना सांगण्यात आले होते. त्यानंतर आरोपीला विना जामीन अटक करण्याचे आदेश ठाण्याचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जे. आर. मुलानी यांनी १८ आॅक्टोंबर २०२२ रोजी काढले होते.
नौपाडा पोलिसांवर नाराजी व्यक्त करीत चांगल्या विश्वासू पोलीस अधिकाºयामार्फतीने विना जामीन अटक करण्याचे समन्स बजावण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्याकडे हे प्रकरण पोलीस आयुक्तांनी सोपविले. घोडके यांनी गुरुवारी आरोपी बिल्डर कुरसिजा यांना या प्रकरणात अटक केली. त्यांना ही शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका नामांकित बिल्डरला इतक्या तडकाफडकी अटक झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.