ठाणे : येथील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावरील ‘पत्रकार भवन’ गेल्या २२ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून त्याच्या पुनर्विकासाच्या नावाखाली पत्रकार, इतर विकासक आणि सरकारची फसवणूक करणारा ठेकेदार राजन शर्मा आणि त्याच्या भावावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे शर्माबरोबर प्रदेश काँग्रेसचे वाणिज्य आणि औद्योगिक सेलचे उपाध्यक्ष किशोर शर्मा यांचेही पितळे उघडे पडले आहे.पत्रकार भवन पुनर्विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या फसवणुकीचे बळी ठरलेले बिल्डर अनिलकुमार सिंग यांनी दिलेल्या पुराव्यानंतर पोलिसांनी शर्मा बंधूवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘भवन’ उभारण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाला १९८८ मध्ये राज्य शासनाने गावदेवी मैदानाजवळ भूखंड दिला होता. पत्रकार संघाशी करार करुन ठेकेदार राजन यांनी या भवनाचे काम घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संघाला जागा देण्याऐवजी गाळे, हॉलची त्यांनी परस्पर विक्र ी केली. यासंदर्भात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करून ठेकेदारावर कारवाईसाठी मागणी केली होती.२३ जून २०१४ रोजी ठेकेदाराशी झालेल्या करारानुसार एक कोटीची अनामत रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र, त्याने ३२ लाख ९५ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे घेऊन फसवणूक केली. महसूल विभाग, पोलीस आणि महापालिकेकडे पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईसाठी संघाने तगादा लावला असता अनेक प्रकरणे समोर आली. त्यातून ठेकेदार शर्माने भवनाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली ठाण्यातील दोन बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचेही उघड झाले.महसूल विभागासह पोलिसांकडे तक्र ार केल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने पितळेंसह पत्रकार संघावरच खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. अखेर शर्मा बंधूचे पितळ उघडे पडले. सातत्याने फसवणुकीने हैराण झालेल्या सिंग यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शर्मा यांच्यावर फसवणूक आणि धमकी दिल्याचे गुन्हे शुक्रवारी रात्री दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)आणखीही गुन्हे दाखल होणारभिवंडीतील गुप्ता कुटुंबीयांचीही एका प्रकरणात शर्माने ५० लाखांची फसवणूक केल्याची माहिती उघड होत आहे. याप्रकरणीही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिल्डर राजन शर्मावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 4:18 AM