अंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मध्यावर असलेल्या साईबाबा मंदिराजवळील झोपडपट्टी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हटवण्यात आली. मुळात हा रस्ता १०० फुटी असल्याने उर्वरित जागेवर झोपडपट्टीमालकांचा ताबा असणे गरजेचे होते. मात्र, झोपडपट्टीमालक या जागेचा ताबा सांगणार, या भीतीने एका बड्या बिल्डरने या जागेवर कोणतीही परवानगी न घेता स्वत:च्या लाभासाठी रस्त्याची जागा अडवली आहे. बिल्डरला विरोध करण्याची भूमिका झोपडपट्टीमालकांनी आणि वडोलच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.साईबाबा मंदिराजवळील झोपडपट्टीधारक अनेक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास होते. रस्ता रुंदीकरणात त्यांचे झोपडे जाणार, याची कल्पना आल्यावर त्यांनी कारवाईला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली होती. या झोपड्यांवर कारवाई झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची कल्पना आल्याने पोलिसांनी आणि एमएमआरडीएने या झोपड्यांवर कारवाई करण्यास सातत्याने चालढकल केली होती. मात्र, या झोपडपट्टीधारकांना रस्ता रुंदीकरणात काढावेच लागणार, याची कल्पना आल्यावर त्यांना कुठे विस्थापित करावे, हा प्रश्न निर्माण झाला. या झोपडपट्टीचा सर्वात मोठा त्रास हा रस्त्यापेक्षा रस्त्याशेजारी असलेल्या एमआयडीसीच्या प्लॉटधारकांना होता. या प्लॉटवर आलिशान व्यापारीसंकुल उभारले जाणार असल्याने या झोपड्या हटवल्यावर काही जागा शिल्लक राहिल्यास ती जागा झोपडपट्टीधारक पुन्हा ताब्यात घेतील, याची कल्पना येताच त्या बिल्डरने सरकारी यंत्रणेचाच वापर करत त्यांना हद्दपार केले आहे. झोपड्या हटवण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे नाव पुढे केले असले, तरी प्रत्यक्षात या बिल्डरसाठी रस्ता मोकळा करून देण्याची घाई यंत्रणांना झाली होती.झोपडपट्टीधारकांनी रस्त्यासाठी जागा सोडल्यावरही ८ ते १२ फूट जागा शिल्लक राहत असल्याने त्या जागेवर त्यांनी अडथळा निर्माण केल्यास रस्त्याला लागून असलेला प्रकल्प धोक्यात येईल, ही भीती निर्माण झाली होती. त्यामुळे या बिल्डरने सरकारी यंत्रणेला हाताशी धरून झोपडपट्टीधारकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे.रस्ता रुंदीकरणात आमची जागा जात असल्याने ती आम्ही देण्यास तयार झालो, मात्र उर्वरित जागा आम्ही ताब्यात घेणार, ही भूमिका आता येथील काही झोपडपट्टीधारकांनी घेतली आहे. यातील काही झोपड्या या वडोलगावातील ग्रामस्थांच्या नावे होत्या. त्यांनीदेखील आपल्या जागेचा ताबा घेण्याची तयारी दर्शवली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यासाठी गेलेली जागा सोडून उर्वरित जागा आम्ही ताब्यात घेणार असल्याचे वडोलच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले आहे.बिल्डरवर कारवाई कराबिल्डरची हद्द ही रस्त्यापासून लांब आहे. रस्ता आणि बिल्डरची जागा यांच्यामध्ये आठ ते बारा फूट जागा शिल्लक राहत असून त्या जागेवर आमचाच हक्क राहील, अशी भूमिका ग्रामस्थांची आहे. दुसरीकडे सरकारी जागेवर संबंधित बिल्डरने पत्रे ठोकून अतिक्रमण केल्याने त्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता संबंधित यंत्रणा कुठली कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आमची आहे. खाजगी बिल्डरने पत्रे लावले असतील, तर ते योग्य नाही. त्यांना या प्रकरणात नोटीस देण्यात आलेली आहे.- श्रीकांत ढिलपे, - उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
बिल्डरने घेतला जागेचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:25 PM