सदानंद नाईक
उल्हासनगर - चित्रपट क्षेत्रात वावर असलेल्या व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी सॅटेलाईट फोनसह चंद्रावर जमीन खरेदी केली. यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत, अभिनेता शाहरुख खान, आग्रा येथील एक इसमाने चंद्रावर जमीन खरेदी केली असून राम वाधवा यांचा देशात चौथा नंबर आहे.
उल्हासनगर यूएसए म्हणून देशात प्रसिद्ध असून बांधकामसह इतर क्षेत्रात शहरातील अनेकांनी नावलौकीक मिळविला आहे. चित्रपट क्षेत्रात वावर असलेले व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी दिवाळी पूर्वी शहरवासीयांना गुड न्यूज दिली. भविष्याच्या दृष्टिकोनातून चक्क चंद्रावर ४३५०० स्केअर फूट म्हणजे एक एकर जागा खरेदी केली. चंद्रावरील जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी जयपूर मधील सुरभी असोसिएट या कंपनीला जमिन खरेदीचे काम दिले होते. कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर जमीन खरेदीची पावती मिळाली असून त्या सोबत बीएसएनएल कंपनीचा १ लाख ७० हजार रक्कमेचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाईट फोन मिळाला. समुद्र, जंगल हेच काय जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हा फोनचा संपर्क होणार असून आऊट गोइंगचा दर मिनिटाला ३५ रुपये असल्याची माहिती राम वाधवा यांनी पत्रकारांना दिली.
देशात चंद्रावर जमीन घेण्याचा पराक्रम दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्यासह प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान व आग्र्यातील एक इसमाने यापूर्वी केल्याची माहिती वाधवा यांनी दिली. तर त्यांचा चौथा नंबर लागतो. शहर चांगल्या ऐवजी इतर बाबतीत प्रसिद्ध आहे. मात्र थेट चंद्रावर जमीन खरेदी केल्याच्या प्रकाराने, नवीन विचारसरणीची चर्चा रंगली आहे. मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जमीन खरेदी केल्याची माहिती वाधवा यांनी देऊन सॅटेलाईट फोनसह चंद्रावरील जमीन खरेदीचे कागदपत्र पत्रकारांना दाखविली आहे. वाधवा यांच्या या कामगिरीने शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत.