- अनिकेत घमंडी डोंबिवली : कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.पहाटे पावणेतीन वाजता इमारत पडल्यानंतर घरांमधून जे सामान मिळेल ते तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रहिवाशांची धावपळ सुरू होती. पण एवढ्या पहाटे टेम्पो, मोठी वाहने कशी मिळणार, या चिंतेने नागरिकांना ग्रासले होते. त्याची कल्पना येताच वृंदा वाट यांनी गुरुवारी व्यवसाय करायचा नाही, भाज्या ठेवण्यासाठी ज्या हातगाड्या होत्या, त्या नुकसानग्रस्तांच्या मदतकार्याला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.त्या म्हणाल्या की, एरव्ही माझ्याकडून वर्षानुवर्षे या नागरिकांनी भाजी नेली आहे, या सगळ्यांची मुले माझ्यासमोर मोठी झाली. संकटकाळात मदत करण्याची हीच ती संधी होती. रहिवासी पवन पाटील यांनी समस्या सांगितल्यावर मी दोन्ही हातगाड्या तेथे पाठवल्या. रस्त्यावर पडलेलं सामान युवकांनी ठेवले आणि मदतकार्याला वेग आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.एवढेच नव्हे, तर इमारत पडल्यानंतर तातडीने महिला, लहान मुलांना त्यांच्या रिकाम्या असलेल्या दोन घरांमध्ये सकाळपर्यंत थांबा असेही वृंदा यांनी सुचवले. ज्यांना कुठेही घर मिळत नसेल, त्यांनी आमच्या रिकाम्या घरात राहायला जावे, भाड्याचे नंतर बघू, नाही जमले तर दोन महिने भाडे देऊ नका, पण घाबरू नका असे सांगून त्यांनी रहिवाशांना दिलासा दिला. घराचे, सामानाचे नुकसान झाले, पण ते भरुन काढता येईल. संकटांना धैर्याने सामोरे जा, असे सांगून त्यांनी महिलांना धीर दिला. शुक्रवारी सकाळपर्यंत भाजीची गाडी त्यांनी मदतकार्याच्या ठिकाणी आणली होती. सर्व आटोपल्यावर व्यवसायाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी कुटुंबीयांना दिल्या होत्या.माजी नगरसेवक संजय पावशे यांनीही काही दुर्घटनाग्रस्त भाडेकरूंना राहण्यासाठी तत्काळ घर उपलब्ध करून दिलासा दिला. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळीच अग्निशमन दल, विष्णुनगर पोलीस आणि समाजसेवकांसह इतरांनी सामाजिक बांधीलकीतून मदतकार्यासाठी तातडीने धाव घेतली. संजय पावशे यांनी टेम्पो, रिक्षा उपलब्ध करून देत रहिवाशांना धीर दिला.
ऐन सणासुदीच्या दिवसात इमारतीचा भाग कोसळल्याने रहिवाशांवर मोठे संकट कोसळले आहे. दिवाळी तोंडावर आली असताना त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांचे संकट खूप मोठे आहे. माणुसकीच्या नात्यातून मी करीत असलेली मदत त्यांच्या संकटापुढे काहीच नाही, असा भावना वृंदा वाट यांनी व्यक्त केल्या.