- सदानंद नाईक
उल्हासनगर : मोहिनी इमारतीची दुर्घटना ताजी असतांना, मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता साई सदन इमारतीचे सिमेंट तुकडे पडल्याने, नागरिकांत खळबळ उडाली. याप्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांना इमारती बाहेर सुरक्षित काढून सुरक्षितस्थळी हलविले असून रात्री इमारत सील करून त्या भोवती लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त तुषार सोनावणे यांनी दिली.
उल्हासनगरात मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू तर १० जण जखमी झाले. ही दुर्घटना ताजी असताना कॅम्प नं-२ झुलेलाल मंदिर परिसरातील साई सदन इमारती मधून मंगळवारी रात्री साडे ११ वाजता सिमेंट कॉंक्रिटचे तुकडे पडू लागले. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी इमारत कोसळणार याभीतीने इमारती बाहेर पलायन केले. महापालिका प्रभाग समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त तुषार सोनावणे यांच्यासह महापालिका टीमने घटनास्थळी धाव घेऊन, इमारती मध्ये राहणाऱ्या ४ कुटुंबांना बाहेर काढून पर्यायी राहण्याची व्यवस्था केली. मात्र त्यांनी आपापल्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी धाव घेतली. सहाय्यक आयुक्त सोनावणे यांच्या टीमने इमारत सील करून खबरदारीचा उपाय म्हणून इमारती भोवती लोखंडी बैरिकेट्स लावण्यात आले.
कॅम्प नं-४ श्रीराम चौका शेजारील आरके टेडर्स या दुमजली इमारतीचा स्लॅब मध्यरात्री कोसळला. इमारती मध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली. महापालिका पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एका आठवड्यात ३ इमारतीचे स्लॅब कोसळल्याने, पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचे बोलले जाते. महापालिकेने वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचे मत नगरिकाकडून होत आहे.