ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण होत असतानाच बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे व कल्याण, डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांची जोडले जावे, यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या प्रकल्पांना एमएमआरडीएने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या भागांचाही विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हातार्डी ते आगासन आणि पुढे आगासन ते कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपर्यंत ६० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार असून त्यामुळे या भागात भविष्यात वाढणारी लोकवस्ती लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने यापूर्वीच रस्त्यांच्या उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत महापालिका हद्दीपलीकडे २७ गावे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याचे रु ंदीकरण आणि त्यांची उभारणी करण्यावरही एकमत झाल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे आता २७ गावांचा विकास सुसाट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई-अहमदाबाद ही बुलेट रेल्वे ठाणे जिल्ह्यातून जाणार आहे. ठाणे खाडीखालून नवी मुंबईमार्गे, भुयारीमार्गे जाणारी ही रेल्वे महापे-शीळ रस्तामार्गे दिवा-म्हातार्र्डी येथून पुढे जाणार आहे. म्हातार्डी येथे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्थानक असणार आहे. तसेच दिवा-पनवेल अशी रेल्वेसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या नियोजन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून दिवा, आगासन, म्हातार्र्डी तसेच आसपासच्या विभागांतील रस्त्यांची बांधणी आणि विकासावर लक्ष केंद्रित केले असून यासंबंधीचा सविस्तर आराखडा गुरु वारी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्यापुढे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सादर केला. यानुसार, म्हातार्र्डी ते आगासनपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत रु ंदीकरण करण्यात येणार असून आगासन ते कल्याण-शीळपर्यंतच्या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा विकास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने करावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. कल्याणफाटा-डोंबिवलीवरून दिवा परिसराकडे येणारा सद्य:स्थितीतील रस्ता हा सहा मीटर रु ंदीचा असून त्याची रु ंदी कमी असल्याने या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.रुंदीकरणावर १०० कोटींचा खर्च- ठाणे महापालिकेने आखलेल्या या आराखड्यानुसार ६० मीटर रुंदीचा रस्ता म्हातार्र्डी ते आगासन आणि आगासन-कल्याण-शीळ रस्त्यास जोडला जाणार आहे. त्यामुळे दिवा विभाग कल्याण-शीळ रस्त्याला जोडला जाईल. यामुळे कल्याणफाटा तसेच शीळफाटा जंक्शनवरील रहदारीचा ताण कमी होईल, असा कयास पालिकेने लावला आहे.- या रस्त्याचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच सल्लागाराची नियुक्ती केली आहे. असे असताना आता या रस्त्याची हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २७ गावांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महापालिकेने एमएमआरडीएकडे केली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या या कामांसाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित असून २७ गावांमधील रस्त्यांची कामे एमएमआरडीएने केल्यास या भागातील नियोजनालाही हातभार लागणार आहे. त्यानुसार, रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर, याला मंजुरी मिळाल्यास २७ गावांचाही विकास सुसाट होणार आहे.
बुलेट ट्रेनमुळे विकास होणार सुसाट; २७ गावांच्या विकासाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:40 AM