शौकत शेख, डहाणू डहाणूच्या सागरी किनारपट्टीवर वसलेल्या सुमारे पंचवीस ते तीस गाव, खेड्या, पाड्यातील हजारो लोकांचा उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या डायमेकिंगचा व्यवसाय सराफांच्या बेमुदत संपामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडून पूर्णपणे ठप्प झाला असून या परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस हजार कुशल अकुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनातील नेकलेस, मंगळसूत्र, इयरींग, चेन, ब्रेसलेट, अंगठी आदी सोने, चांदीचे अलंकार कलाकुसरीने घडविण्यासाठी मुख्य साधन असलेल्या डाय (साचा) बनविण्याचा म्हणजेच डायमेकिंगचा मोठा व्यवसाय डहाणूत आहे. अलंकार किंवा दागिने बनविणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. साधारणत: पन्नास, साठ वर्षांपूर्वीपर्यंत हे काम सोनार हस्तकलेने करीत असत. त्यासाठी लागणारी साधन, सामुग्री ते स्वत: बनवित असत. पण काळ बदलला. आर्थिक परिस्थिती सुधारली आणि साहजिकच अलंकारांना मागणीही वाढली. दागिन्यांची डिझाईन्स दरवर्षाला बदलू लागली आणि त्यानुसार नवे दागिने घेणे किंवा जुने दागिने नव्याने घडवून घेणे याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने दागिने निर्मितीसाठी डायचा वापर वाढला. या डायची निर्मिती डहाणू, तारापूर, चिंचणी येथील ३० गावांत मोठ्या प्रमाणात होऊ लागली. या भागातील उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता घरच्या घरीच डायमेकिंग करून उदरनिर्वाह करीत आहेत.हजारोंवर ओढावली उपासमारीयेथील डाय (साचे)ला दिल्ली, जयपूर, राजस्थान, मद्रास, कर्नाटक, तामिळनाडू, मुंबई, कलकत्ता, बांगलादेश, नेपाळ, भुतान, श्रीलंका, हैद्राबाद, नागपूर, कानपूर, लखनौ येथे मोठी मागणी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यांच्या दागिन्यांवर लादलेल्या अबकारी कराविरोधात सराफांनी बेमुदत बंद पुकारल्याने सोने, चांदीचे व्यापारी, दलाल या भागात फिरकतही नाही. शिवाय पोस्टाने पाठविलेली डाय व्यापारी सोडवत नसल्याने ते पुन्हा डायमेकरकडे येऊन पडत आहे. परिणामी येथील हजारो डायमेकिंगचे दुकाने बंद पडली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधीत असलेले हजारो कुशल-अकुशल कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सराफा बंदने डायमेकिंग ठप्प
By admin | Published: March 21, 2016 1:13 AM