- सदानंद नाईकउल्हासनगर महापालिकेत अपुरा अधिकारीवर्ग असल्याचे निमित्त करून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाचा पदभार दिला आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका संशयास्पद असून लाचखोरांचा विरोध करण्याऐवजी त्यांना चांगल्या जागी नियुक्ती मिळण्यासाठी तेच राजकीय वजन वापरतात.उल्हासनगर महापालिका, प्रांत कार्यालय, तहसील, भूमापन, पोलीस आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी असे गेल्या पाच वर्षांत २१ पेक्षा जास्त व्यक्ती लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. महापालिका विभागातील नगररचनाकार विभाग, प्रभाग अधिकारी, बांधकाम विभाग, विधी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. अशा लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना महत्त्वाच्या पदांवर व पूर्वी काम करीत असलेल्या विभागात नियुक्त केल्याचे चित्र आहे. ज्या अधिकाºयाचे त्या विभागात व त्या पदामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्याने त्याला अटक झाली, त्याच व्यक्तीला पुन्हा काही महिन्यांत तेथे नियुक्त केल्याने या अधिकाºयांविरुद्ध पुन्हा लाचलुचपत खात्याकडे तक्रार करण्यास कोण कशाला धजावेल, असा प्रश्न आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराचा दावा प्रशासन कशाच्या जीवावर करते, असा सवाल नागरिक करीत आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडलेले काही अधिकारी हे नगरसेवकांनाही अर्थपूर्ण मार्गदर्शन करीत असल्याने ते त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. नगरसेवकांना हवी असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ते मदत करीत असल्याने त्या अधिकाºयांचा भ्रष्टाचारही नगरसेवकांकरिता क्षुल्लक बाब ठरली आहे. महापालिकेत अशा भ्रष्ट अधिकाºयांचे एक कोंडाळे तयार झाले आहे. नव्याने आयुक्तपदी येणाºया व्यक्तीला ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करतात. समजा, एखाद्याने त्या प्रयत्नांना धूप घातली नाही, तर ते आयुक्त टिकणार नाहीत, याचा बंदोबस्त हे मूठभर भ्रष्ट अधिकारी करतात. वर्षानुवर्षे अशा भ्रष्ट अधिकाºयांच्या टोळक्याकडे सूत्रे असल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली असून हे अधिकारी व त्यांना पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी गबर झाले आहेत. उल्हासनगर अनेक समस्यांचे माहेरघर राहण्याचे प्रमुख कारण हे भ्रष्टाचार हेच आहे.
उल्हासनगरात लाचखोर अधिकाऱ्यांची कंपूशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:43 PM