कल्याण : एकीकडे वाहनचोरीच्या घटनांनी वाहनचालक त्रस्त झाले असताना दुसरीकडे शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्रही सुरू आहे. सोमवारी चार घरफोडीच्या घटना घडल्या असून या घटना मध्यरात्रीबरोबरच भरदिवसाही घडू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील चंद्रेश गॅलक्सी, अभिषेक बिल्डिंगमध्ये राहणारे मिनाज सय्यद यांच्या घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याच ठिकाणी राहणारे अशोक बोंगार्ड यांच्यासह बाजूच्या अंकित सोसायटीमध्ये राहणारे किरण खांडगे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील मुद्देमाल लंपास केला आहे. या ठिकाणांहून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती मिळू शकलेली नाही. चौथी घटना बाजारपेठ हद्दीतील त्र्यंबकेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. येथे राहणारे विशाल भोईर यांच्या घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड असा ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. महत्त्वाचे म्हणजे या चारही घरफोडीच्या घटना सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान घडल्या आहेत. या घटनांप्रकरणी अनुक्रमे खडकपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाहनचोरी आणि दुचाकीचोरींचा छडा पोलिसांकडून लावला जात असताना आता घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
------------------------------------------------------