मीरा रोड : भाईंंदर पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मीठ विभागाच्या जागेतील मोठी जुनी झाडे जाळण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिवाय या ठिकाणी असलेल्या पडीक घरांमध्ये गर्दुल्ल्यांंनी बस्तान मांडले असून लघुशंका करणाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र मीठ विभागासह महापालिका आणि पोलीस कारवाई करत नसल्याने नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.
पश्चिमेला मीठ विभागाचे जुने कार्यालय आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे आहेत. ही बांधकामे जुनी असून काही घरे पडीक आहेत. या ठिकाणी जुनी मोठी झाडे आहेत. येथे बगळे, साळुंकी आदी अनेक पक्ष्यांची घरटी आहेत. मीठ विभागाने मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी कुंपण, रखवालदार अशी कोणतीच उपाययोजना नसल्याने मोठ्या संख्येने रिक्षाचालक व अन्य नागरिक सर्रास लघुशंका करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही वर्षांपूर्वी पडीत घरात तृतीयपंथीय वेश्या व्यवसाय करायचे. गर्दुल्ल्यांना आजूबाजूच्या रहिवाशांनी विरोध केला तर त्यांच्यावर दगड फेकणे, शिविगाळ आदी प्रकार घडलेले आहेत.
हे सर्व सुरू असताना मोठमोठ्या झाडांच्या बुंध्यांना आगी लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. झाडांना जाळणे तसेच गर्दुल्ले, लघुशंका करणाºयांबद्दल रहिवाशी महेंद्र सिंग व विजय शर्मा यांनी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, मीठ विभागाचे उपअधीक्षक विजय अग्रवाल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु काहीच कारवाई केली जात नाही. अग्रवाल तर आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगून हात झटकत असल्याचा संताप शर्मा यांनी व्यक्त केला.
पर्यावरणाचा ऱ्हासमीरा-भाईंदर पालिकेकडून यापूर्वीही पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही या प्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.