ठाणे - भारत सरकारच्या प्रदूषण विभागाच्या वाहनाला ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नल येथे अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यामधील मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाहतुक थांबविण्यात आली होती.
ही व्हॅन मीरारोडवरून बाळकुमकडे जात होती. यावेळी गाडीत चालकासह अन्य दोन जण होते. गाडीत नागला बंदर रोड येथील सिग्नलला येताच गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरू झाले आणि अचानक गाडीला आग लागली. या गाडीत ध्वनी व हवेतील धुलीकणाचे प्रदुषन मोजण्याच्या मशिन्स होत्या. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मुख्य रस्त्यावर वाहनाला आग लागल्याने त्या रस्त्यावरील वाहने दहा ते पंधरा मिनिटे थांबविण्यात आले होते. यावेळी एक फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि एक हायड्रा पाचारण केले होते.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.