किन्हवली - तालुक्यातील आदिवासी व दुर्लक्षित विभाग असणाऱ्या डोळखांब भागातील सावरपाडा या गावात राहणाऱ्या सोनी संजय वाघ या विधवेच्या घराला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागून घराचे पूर्णपणे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.सोनी वाघ यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना मूलबाळ नाही. घरात एकट्याच मोलमजुरी करत आहेत. घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू जळाल्यामुळे अस्मानी संकट ओढावले आहे. तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. एकूण ४८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पंचनाम्यात स्पष्ट केले आहे. लवकरच हा अहवाल वरिष्ठांना पाठवून नुकसानभरपाई पीडित महिलेला मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या घटनेची पाहणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असून पाहणी करण्यासाठी इन्स्पेक्टर पाठविले आहेत. त्यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर सरकारकडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रकल्प अधिकारी आर. किल्लेदार यांनी सांगितले. वणव्यात झोपडीला आग उन्हाळा सुरू झाला की जंगलांना आगी लावण्याच्या घटना सुरू होतात. असाच प्रकार तालुक्यातील आस्कोत गावातील जंगलात घडला. या ठिकाणी लागलेल्या की लावलेल्या आगीत आदिवासीची झोपडी जळून भस्मसात झाली तर एका मेंढीचा मृत्यू झाला. आग विझवताना महिला वन कर्मचारी भाजल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आस्कोत गावाच्या जंगलात आदिवासींच्या झोपड्या आहेत . त्यातील शंकर मुकणे यांच्या झोपडीला अचानक आग लागली. वणवा विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना महिला वनकर्मचारी अल्पना घोलप या भाजल्या.
डोळखांब येथील आदिवासी महिलेचे घर जळून खाक; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 1:04 AM