लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात संबंध बिघडत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ‘चंदगड’ या ठिकाणी ये-जा करता यावे, यासाठी लालपरीच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
हा प्रवास महाराष्ट्र-कर्नाटकमार्गे पुन्हा महाराष्ट्र असा असणार आहे. ठाणे येथून थेट चंदगडला लालपरीतून अवघ्या ९९० रुपयांमध्ये प्रवास करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ठाणे, स्वारगेट, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, निपाणी, गडहिंग्लज, नेसरी, चंदगड तेथील नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.
धाडसी निर्णय n कोल्हापूर येथे काही प्रवासी संघटनांनी चंदगड येथे ये-जा करण्यासाठी एसटी (लालपरी) बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. n त्या मागणीला अनुसरूनच हा मार्ग नियोजित केला आहे. पण, चंदगड हे जरी महाराष्ट्रामध्ये असले तरी तेथे जाण्यासाठी कर्नाटकमार्गे पुन्हा महाराष्ट्रात यावे लागते. n एकीकडे दोन्ही राज्यात सीमावाद पेटला असताना, ठाणे विभागाने एक धाडसी निर्णय घेतला आहे.
बसच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन वंदना बसस्थानक येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
ही बस ठाणे वंदना बसस्थानकातून ही बस ठाणे वंदना बसस्थानकातून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, चंदगड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे चंदगड येथून दुपारी साडेतीन वाजता निघून ठाणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत येईल, असे ठाणे विभागाने म्हटले आहे. लालपरीच्या प्रवासासाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन आरक्षणव्यवस्था उपलब्ध आहे.