अंबरनाथ : लोकलसेवा बंद असल्याने सर्व ताण हा बससेवेवर पडला आहे. मात्र, अंबरनाथहून बस सुटण्याचे प्रमाण कमी असून सर्व बस या बदलापूरमधून सुटतात. बदलापूरहून सुटणारी प्रत्येक बस भरून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे अंबरनाथच्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या संतापात दिवसेंदिवस वाढ होत आहे.अंबरनाथ आणि बदलापूरमधून मुंबईला मोठ्या संख्येने चाकरमानी नोकरीला जातात. लोकलसेवा बंद असल्याने खाजगी कंपनीतील कामगार हे कामावर जाण्यासाठी बसचा आधार घेतात. मात्र, आता कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने बससेवाही अपुरी पडत आहे. बदलापूर रेल्वेस्थानकाबाहेरील डेपोतून बस सुटत असल्याने तेथेच त्या भरतात. त्यामुळे अंबरनाथचे प्रवासी ज्या स्टॉपवर बसची वाट बघत बसतात, त्या बसमध्ये त्यांना चढण्यासाठी जागाच मिळत नाही. अंबरनाथहून मुंबईसाठी कमी बस असल्याने बदलापूरच्या बसवर अवलंबून राहण्याची वेळ अंबरनाथच्या प्रवाशांवर आली आहे.शुक्रवारी अशीच एक बस सकाळी बदलापूरहून भरून आली होती. त्या बसमध्ये चढण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बसच्या वाहकाने अंबरनाथ येथील महात्मा गांधी स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुनील पारटे या प्रवाशाने बसची मागची काच दगड मारून फोडली. त्यामुळे प्रवाशांचा संताप हा अनावर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकलसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत अंबरनाथच्या डेपोतून मुंबईसाठी बस सुरू करावी, अशी मागणी अंबरनाथकर प्रवासी करत आहेत.लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे मुंबई व परिसरातील कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, दूरवरून कामाच्या ठिकाणी जाणाºया नोकरदारांना प्रवासात अडथळे येत असल्याने नाराजी आहे.कामावर जाणे हे आता गरजेचे झाले आहे. बदलापूरहून बस भरून येत असल्याने आम्हाला जागाच मिळत नाही. त्यामुळे कामावर जाण्यास विलंब होतो. तर, काही वेळेस उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अंबरनाथहून अधिकची बससेवा मुंबईसाठी सुरू करण्याची गरज आहे.- विशाखा पडवे, प्रवासी, अंबरनाथ
बदलापूरहूनच बस भरून येतात, मग आम्ही चढणार तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:54 AM