पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून बंद असलेले परमिट रुम, बार आणि हॉटेल्स उघडण्यात आली असली तरी संध्याकाळी ७ वाजताच बार बंद केले जात असल्याने व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.पालघर जिल्ह्यात एकूण ४१५ बार आणि परमिट रूम असून जिल्ह्यात मद्यविक्रीतून सुमारे १६३ कोटींची उलाढाल होते. मात्र मार्चपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बार, परमिट रूम, बिअर शॉप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांच्या तोट्यासह ही यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. मे महिन्याच्या शेवटी शासनाने परमिट रूमधारकांना पार्सलची मुभा दिली असली तरी काम सोडून परगावी गेलेले कामगार, धूळखात बंद पडलेली खाद्य सामग्री, यामुळे पूर्णत: कोलमडून पडलेल्या व्यावसायिकांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील ४१० परमिट रूमपैकी फक्त १४९ परमिट रूमधारकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.राज्य शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत महसूल, वन आणि मदत पुनर्वसन विभागाने ३० सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात ५ आॅक्टोबरपासून बार आणि परमिट रूमच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्याची परवानगी दिली होती. तर राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या सहसंचालकांनी बुधवारी, ७ आॅक्टोबर रोजी पत्र काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेपर्यंत बार आणि परमीट रूम उघडे ठेवण्यासंदर्भात आदेश पारित केले होते. मात्र पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित न केल्याने संध्याकाळी ७ वाजता उत्पादन शुल्क विभागाकडून बार, परमिट रूम बंद केले जात होते.वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात बार आणि परमिट रूमधारकास ७ लाख ३५ हजार रुपये, पालघर नगर परिक्षेत्रात ८० हजार, डहाणू नगरपरिषद परिषद क्षेत्रात ८६ हजार आणि ग्रामपंचायत क्षेत्रात ५७ हजार रुपये लायसन्स फी, राज्य उत्पादन फी भरावी लागते.संध्याकाळी ७ वाजताच बार आणि परमिट रूम बंद केल्यास एवधी हजारो रुपयांची फी भरणार कुठून? असा प्रश्न बार असोसिएशनचे कार्याध्यक्ष भुजंग शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा बार आणि परमिट रूम बंद ठेवली तरी चालतील, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे.या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांशी बैठक आयोजित केली असून व्यावसायिकांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहील, याबाबत आदेश काढले जातील.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर
बार, हॉटेल्स ७ वाजताच बंद केले जात असल्याने व्यावसायिक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:17 AM