भिवंडी : तीन व्यावसायिकांनी व्यापाऱ्यासह त्याच्या सासऱ्याला बांधकामात भागीदारी देण्याच्या नावाने मूळ जमीन मालकास देण्यासाठी पावणेपाच कोटी उकळले. त्याची परतफेड न करता उलट व्यापाऱ्याला दमदाटी करून त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी करीत पैशांचा अपहार केल्याप्रकरणी तिघा व्यावसायिकांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. संजय कानजी भानुशाली (३७), जयंतीलाल गोपालजी भानुशाली (५० दोघे रा. मुलुंड प.) व जेसा लिरा पटेल (५८) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
व्यापारी मनजी नारायण सांडा (५५ रा. घोडबंदर, ठाणे) याच्यासह त्याच्या सासऱ्याला २०१५ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत तिघांनी भागीदारीची माहिती दिली. कोनगाव येथील राममंदिरामागे विकसित केलेल्या 'श्री. जी. रियल्टी' व 'श्री. जी डेव्हलपर्स' च्या बांधकामात भागीदार करून बांधकामाकरिता जमीन खरेदी, बांधकाम साहित्य व जमीन मालकास पैसे देण्याच्या नावाने सांडा यांच्याकडून ४ कोटी ८९ लाख ७३ हजार ५०० रुपये उकळले. त्यानंतर २ कोटी आणि ८७०५ चौ. फूट कार्पेट एरिया देण्याचे आश्वासन देऊन 'श्री. जी. रियल्टी' या कंपनीमधून रिटायरमेंट घेण्यास सांगून ४ कोटींचा कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. याउलट पैशांचा हिशेब मागितला असता दमदाटी करून आणखी पैशांची मागणी केली, अशी तक्रार सांडा यांनी १० जुलै २०२४ रोजी दाखल केली होती.
चौकशी अंती वरिष्ठांच्या परवानगीने तिघा व्यावसायिकांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात ४ एप्रिलला गुन्हा दाखल झाला.