सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील सपना गार्डनमध्ये जिल्ह्यातील पाहिले बटरफ्लाय गार्डन उभारण्याची संकल्पना मांडून त्यासाठी नगरसेवक मनोज लासी यांनी कंबर कसली आहे. यासाठी बटरफ्लाय गार्डन बनविणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमने सपना गार्डनचे सर्वेक्षण केल्याची माहिती लासी यांनी पत्रकारांना दिली.उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून जेमतेम १३ किमी क्षेत्रफळामध्ये नऊ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. मुलांना खेळण्यासाठी व विरंगुळ्यासाठी जागा नसल्याची खंत नागरिक नेहमी व्यक्त करतात. गोल मैदान, दसरा मैदान आणि व्हीटीसी मैदान अशी फक्त तीन मैदाने शहरात असून उद्यानांची संख्या समाधानकारक असली, तरी मोजकीच चांगल्या स्थितीत आहेत.
कधीकाळी हिराघाट बोटक्लब येथे सुंदर असे गार्डन व बोटची व्यवस्था होती. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हिराघाट बोटक्लब बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिक व मुलांच्या विरंगुळ्यासाठी बटरफ्लाय गार्डन उभे करण्याची संकल्पना नगरसेवक मनोज लासी यांनी विविध राजकीय नेते, समाजसेवक, सामाजिक संस्थाचालक यांच्यासमोर मांडल्यानंतर, सर्वांनी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. शहरात एक चांगली वास्तू उभी राहण्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहनही लासी यांनी केले आहे.
दानशुरांचा लागतोय हातभारशहरात बटरफ्लाय गार्डन उभे करण्यासाठी महापालिका निधी, आमदार निधी तसेच नगरसेवक निधी देणार असल्याचे संकेत मनोज लासी यांनी दिले. विविध सामाजिक संस्था, समाजसेवक, दानशूर व्यक्ती हे गार्डन उभे करण्यासाठी हातभार लावण्याची शक्यता लासी यांनी व्यक्त केली. लासी यांच्या संकल्पनेतून यापूर्वी गोल मैदान, सपना गार्डन येथे सेल्फी पॉइंट उभे राहिले आहेत. बटरफ्लाय गार्डन उभे करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त करून सर्वेक्षण करून गेलेल्या तज्ज्ञांची समिती लवकरच एकूण खर्चाबाबत माहिती देणार आहे. त्यानंतर बटरफ्लाय गार्डनला मुहूर्त सापडणार असल्याचेही बोलले जात आहे. गार्डन उभे राहिल्यास १०५ प्रजातींची फुलपाखरे गार्डन परिसरात बघायला मिळणार आहेत.