ठाणे : कोविड हॉस्पिटल व क्वारंटाइन केंद्रासाठी तब्बल २१ हजार बेडशीटची प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात ६ जुलैपासून दररोज केवळ ५०० अंथरुण-पांघरुणांची धुलाई केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने २१ हजार बेडशीटची खरेदी करून उधळपट्टी का केली, असा आक्षेप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी घेतला आहे. ६ जुलैपासून लॉण्ड्री सुरू करणाऱ्या प्रशासनाने मार्चपासून ५ जुलैपर्यंत अंथरुण-पांघरुणांची धुलाई केली नव्हती का, असा सवालही त्यांनी केला आहे.
महापालिकेच्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वेबिनार महासभेमध्ये १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबरपर्यंतच्या लॉण्ड्रीच्या तीन लाख रुपये खर्चाला कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रशासनाच्या प्रस्तावानंतर कोविड रुग्णांचे बेडशीट, पिलो कव्हर आदींची (अंथरुण-पांघरुण) धुलाई होत असल्याचे उघड झाले आहे. तत्पूर्वी यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोनाच्या रुग्णांसाठी मार्चच्या अखेरीस क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले. परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या भाईंदरपाडा, होरायझन, अक्मे ऑझोन आणि बीएसयूपी कासारवडवली येथील सेंटरमधील रुग्णांनी वापरलेले बेडशीट, पिलो कव्हर, लिनन आदींची (अंथरुण-पांघरुण) प्रत्येक नग २० रुपयांप्रमाणे दररोज ५०० नगांची धुलाई करण्यास आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी मान्यता दिली होती. प्रत्यक्षात त्याआधी ६ जुलै २०२० पासून ग्लोबल लॉण्ड्रीला धुलाईचे काम देण्यात आले होते. यापूर्वी मार्चपासून ५ जुलैर्पयत बेडशीट-पिलोची धुलाई केली नव्हती का, तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने तब्बल २१ हजार बेडशीटची खरेदी का केली, असा सवालही नारायण पवार यांनी केला आहे.
ग्लोबल लॉण्ड्री कोणाची?या कामासाठी ग्लोबल लॉण्ड्रीची निवड कोणत्या पद्धतीने करण्यात आली, यासंदर्भात निविदा काढण्यात आली होती का, ग्लोबल लॉण्ड्रीचे काम कोणत्या ठिकाणाहून सुरू आहे, अशा अनेक प्रश्नांची प्रशासनाने उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.