भार्इंदर : भाजपा नेत्यांकडे मते विकत घ्यायला पैसे आहेत, पण लहान मुलांसाठी आॅक्सिजन विकत घ्यायला पैसे नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी केली. मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.गोरखपूरमध्ये झालेल्या बालमृत्यूवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. देशात असे बालमृत्यू यापूर्वीही घडले आहेत, असे वक्तव्य शहा यांनी केले होते. २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशाच वक्तव्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पद गेले होते. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी भान ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री फिरतात. मैदानात उतरतात. त्यासाठी ठेकेदारांकडून देणग्या गोळा केल्या जातात आणि नंतर त्याच ठेकेदारांना लाच प्रकरणात अडकवले जाते, असे आरोपही ठाकरे यांनी केला. देशात लाटा येतात आणि जातात; पण शिवसेना प्रत्येक लाट पचवून उभी आाहे. उलट ती पूर्वीपेक्षा जोमाने वाढली आहे, असे सांगत त्यांनी मोदी लाटेवरही टीका केली.>‘मतदानयंत्रांवर लक्ष ठेवा’मीरा-भार्इंदरच्या मतदानावेळी रविवारी मतदानयंत्रांवर लक्ष ठेवा. कारण बुलढाण्यात कोणतेही बटण दाबले तरी मत एकाच पक्षाला पडत होते, असा टोला उद्धव यांनी भाजपा नेत्यांना लगावला. एवढाच इव्हीएमचा (इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा) पुळका असेल तर ती त्यांनी मुंबई विद्यापीठात बसवावी. त्यातून निकाल तरी वेळेत लागतील, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला.
मते विकत घेण्यापेक्षा आॅक्सिजन विकत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:15 AM