नालासोपारा : ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या महत्त्वाच्या बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल साडेदहा हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागांपैकी १८ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले. त्यांनी महाविकास आघाडी प्रणित महाविकास परिवर्तन पॅनलवर विजय मिळविला. ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या, तर उरलेल्या १५ संचालकांसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सहकार आणि महाविकास परिवर्तन पॅनलचे प्रत्येकी १५ उमेदवार आणि १६ अपक्ष उमेदवार सहभागी झाले होते. जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड असे दोन मंत्री आले होते, परंतु त्याचा प्रभाव मतदानावर पडला नसल्याचे पाहायला मिळाले. बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनलने ही निवडणूक शिट्टी या चिन्हावर आणि महाविकास परिवर्तन पॅनलने कपबशी या चिन्हावर लढविली. या निवडणुकीत चार फेऱ्यांमध्ये ९१ टक्के मतदान झाले होते. बुधवारी लागलेल्या निकालानुसार, बहुजन विकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकूण १८ जागांवर विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालक मंडळावर बविआचे वर्चस्व असेल. आम्ही सतत पाच वर्षं लोकांच्या सेवेत इथेच असतो. फक्त निवडणुकीपुरते लोकांना सामोरे जात नाही. त्यामुळे हा विजय म्हणजे मतदारांनी आमच्या सेवेला दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली, तसेच पाच वर्षांपूर्वी बँकेच्या ठेवी साडेसहा हजार कोटींच्या घरात होत्या, पण चार वर्षांमध्ये त्यात आणखी चार हजार कोटींची भर टाकण्यात आम्हाला यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा बँकेत बविआ प्रणित पॅनलची सत्ता, जिंकल्या २१ पैकी १८ जागा; महाविकास आघाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:30 AM